प्रश्न आणि उत्तरे

0
8

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर संसदेमध्ये दोन दिवस अपेक्षेनुरूप वादळी चर्चा झाली. विरोधकांकडून पहलगाम हल्ला आणि त्यानंतरची भारताची पाकिस्तानविरुद्धची लष्करी मोहीम, त्यानंतरचा आकस्मिक युद्धविराम ह्यासंदर्भात जे जे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात होते, त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने ह्या चर्चेवेळी झाला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी चर्चेची सुरूवात केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने लोकसभेतील ह्या चर्चेचा समारोप झाला. ह्या दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सरतेशेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या भात्यातील एकेक बाण निकामी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यावर विरोधकांचे किती समाधान झाले हा भाग अलाहिदा. मुळात संसदेमध्ये ही चर्चा चालली असताना आणि विरोधक ‘ऑपरेशन सिंदूर’ वर चर्चा नंतर करू, आधी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत हे सांगा, असा सवाल करीत असतानाच पहलगाम हल्ल्यातील तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याची सुवार्ता आली. हे तिघेही दहशतवादी अशा प्रकारे वेळीच मारले जाणे हा केंद्र सरकारच्या दृष्टीने अर्थातच मोठा दिलासा ठरला. विरोधकांकडून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात अनेक प्रश्न आजवर सातत्याने उपस्थित केले जात होते. ‘दहशतवादी हल्ला होणे हे गुप्तचर व सुरक्षायंत्रणांचे अपयश नव्हते का?’, ‘हे दहशतवादी कुठे लपले आहेत?’, ‘ऑपरेशन सिंदूर’राबवताना पाकिस्तानला पूर्वकल्पना दिली गेली होती का?’ ‘भारताची किती विमाने या मोहिमेदरम्यान पाकिस्तानने पाडली?’, ‘अचानक युद्धविराम का स्वीकारला गेला?’, ‘अमेरिकेच्या दबावातून हा युद्धविराम झाला का?’ ‘आपल्या सैन्यदलांना मर्यादा घालून दिली गेली होती का?’, ‘जगात भारत एकाकी पडलेला दिसला नाही का?’ ‘चीनने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला असताना त्याचे नाव का वगळले जात आहे?’ असे अनेक टोकदार सवाल विरोधी सदस्यांनी संसदेतील चर्चेदरम्यानही केले. पंतप्रधान मोदी आणि सहकारी मंत्र्यांनी ह्या सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरणे दिली. युद्धविरामामागील अमेरिकेच्या कथित दबावासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘डोनाल्ड ट्रम्प हे खोटारडे आहेत हे जाहीरपणे सांगा’ असे आव्हान दिले होते. मुत्सद्देगिरीत रस्त्यावरची भाषा वापरली जात नसल्याने मोदींनी आपल्या उत्तरात ट्रम्प यांचे नाव घेतले नसले, आणि तरी जगातील कोणत्याही नेत्याने युद्ध थांबवण्यास सांगितले नव्हते हे प्रथमच स्वमुखाने सांगितले. ह्यापूर्वी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने त्यांच्या ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवाला देऊन हे सांगितले होते. मात्र, ट्रम्प पुन्हा पुन्हा युद्धविरामाचे श्रेय स्वतःकडे घेत राहिले आहेत. आता स्वतः पंतप्रधान मोदींच्या स्पष्टीकरणानंतर तरी ट्रम्प यांचा जप थांबेल अशी आशा आहे. ऑपरेशन सिंदूर राबवताना पाकिस्तानला पूर्वकल्पना दिली होती, युद्ध करण्याची भारताची इच्छा नसल्याचे सूचित केले होते वगैरे वगैरे टीकास्त्र राहुल यांनी आपल्या भाषणात सोडले. खरे तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादी अड्ड्यांवरील हल्ल्यानंतर ही कारवाई केवळ दहशतवाद्यांविरुद्ध असल्याची माहिती दिली गेली होती असे स्पष्ट केले होते. संसदेत संरक्षणमंत्र्यांनीही त्याचा पुनरुच्चार केला. तरीही हा मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित केला गेला. भारताची किती विमाने पाकिस्तानने पाडली ह्या प्रश्नातही विरोधी पक्षांना मोठा रस दिसतो. खरे तर परीक्षेतील यश महत्त्वाचे आहे, पेपर लिहिताना पेन्सील तुटली की पेन हरवले हे महत्त्वाचे नाही अशा योग्य शब्दांत संरक्षणमंत्र्यांनी हा विषय निकाली काढला होता, परंतु सरकारला अडकवण्यासाठीच हा तपशील विरोधकांना हवा आहे असे दिसते. आपण हा प्रश्न विचारून सरकारला नव्हे, तर भारतीय हवाई दलाला अपमानीत करतो आहोत ह्याचे भानही ह्या मंडळींना उरलेले दिसत नाही. युद्धामध्ये प्रत्येक तपशील सांगणे सरकारवर बंधनकारक नसते, कारण त्यात राष्ट्रीय सुरक्षेचे विषय गुंतलेले असतात. आवश्यक ती माहिती वेळोवेळी पत्रकार परिषदांमधून सविस्तरपणे दिली गेली आहेच. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भलभलते प्रश्न उपस्थित करून सरकारचे श्रेय हिरावून घेण्याचा आटापिटा करण्यापेक्षा ह्या कारवाईचा पाकिस्तानला आणि त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना धाक बसावा ह्यासाठी खंबीर राष्ट्रीय मतैक्याची आज आवश्यकता आहे. विरोधकांकडून उपस्थित केले जाणारे सवाल पाहून पाकिस्तान गालातल्या गालात हसतो आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवाद्यांना आणि पाठीराख्यांना जन्माचा धडा शिकवण्यासाठी होते ना? मग त्याला मतांच्या हिशेबात मोजले जाऊ नये एवढीच देशाची अपेक्षा आहे.