प्रदर्शन

0
169
  • मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर
    (म्हापसा)

आपलं जीवन हेही एक प्रदर्शनच नाही का? त्या जगन्नियंत्याने मांडलेलं! सर्वांच्या दैवाची दोरी आपल्या हातात धरून नाचवल्या जाणार्‍या आम्हा कळसूत्र्यांचं त्या विधात्यानं मांडलेलं हे निरंतर असं वैश्विक प्रदर्शनच तर आहे!

सध्या सर्वत्र सतत प्रदर्शनांना ऊत आलेला दिसतो. दर्शन देणे, दाखवणे, मांडणे अशा अर्थाने हे प्रदर्शन! दरवर्षी भरणार्‍या प्रदर्शनाचं स्वरूप तेच असतं. वस्तूही थोड्या- फार फरकाने त्याच, जागाही त्याच त्याच! पण तरीसुद्धा भेटकारांच्या लोंढ्याला कधीच ओहोटी नसते. याचं कारण, माणसाच्या हौसेला आणि सोसाला अंत नसतो. पैसे मोडून खरेदी करण्याची ताकद नसलेल्यांचीदेखील तिथे उपस्थिती असते ही माणसांमधील उत्कंठेची, कुतूहलाची, रसिकतेची खूणच आहे.

प्रदर्शनं विविध प्रकारची भरत असतात. नवनवीन फॅशन्सचे पोशाख, साड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, लाकडी फर्निचर, कार्पेट्‌स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मसाले, विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, धातूंच्या मूर्ती, चादरी, अलंकार, पर्सेस, चपला, साबण, बेगमीचे पदार्थ काय नि किती नाव सांगावीत? सगळा माल एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्‍या या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेतच लोक असतात. हे झालं जीवनावश्यक वस्तूंचं प्रदर्शन.

याचबरोबर देशातील कितीतरी माहितीचं ज्ञान देणारी प्रदर्शनं विलोभनीय असतात. कधीही न पाहिलेली फुलं, गुलाबाच्या जाती, शोभेच्या आणि औषधी वनस्पती, आंब्याच्या अनेक जाती, एवढंच नाही तर मेंढ्या, कोंबडे, गाय, कुत्री अशा जनावरांची प्रदर्शनं तर ज्ञानात भर टाकणारी असतात. निसर्गाची किमया पाहून थक्क व्हायला होतं. आजच्या आधुनिक युगात व्हॉट्‌सऍपवरूनही नवनवीन गोष्टींचं प्रदर्शन पहायला मिळतं. परवाच, वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून, हातात छत्री, डोळ्यांवर गॉगल, डोक्याला स्कार्फ, उंच सँडल्स, बॅग, फुलांचा बुके अशा थाटात एखाद्या शानदार युवतीप्रमाणे दोन पायांवर रँप वॉक करणार्‍या वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचं प्रदर्शन पाहिलं. मुके प्राणी बिचारे मालकांचे आज्ञापालन करण्यात किती समजुतदारपणा दाखवतात हे माणसांनीही त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे, असं वाटून गेलं. खूपच कौतुकास्पद!

याव्यतिरिक्त माणसांमधील कलांचंही प्रदर्शन होत असतं. कलादालनामध्ये चित्रकला, हस्तकला, रंगकला, रांगोळीकला, छायाचित्रकला, दगड-काष्ठ यांच्यातून निर्माण होणारी शिल्पकला यांची प्रदर्शनं भरवली जातात. कलेच्या दुर्मीळतेमुळे यांचा दाम सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. अशा प्रदर्शनांना रसिकांची उपस्थिती फारच कमी असलेली जाणवते. याचं कारण या कलांचा आस्वाद घेण्यासाठी लागणारी एक खास नजर लागते ती फारच थोड्यांजवळ असते. देशभरातील गायक, वादक, नर्तक आपापल्या राज्यातील पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता देशभर भ्रमंती करत असतात. या कलांचं शास्त्रोक्त ज्ञान सर्वच रसिकांना अवगत नसलं तरी ते करमणूकप्रधान आणि मनोरंजक असतं. अशी प्रदर्शनं रसिकांना ज्ञानसमृद्ध करत असतात.
वाचनप्रिय रसिकांची पुस्तकप्रदर्शनांना लाभलेली उपस्थिती लक्षणीय असते. पुस्तकांच्या प्रदर्शनाला कधीही तोटा नसतो. आता तर ‘बुक फेअर बाय वेट’ हे नव्या पद्धतीचं प्रदर्शन मिरामारला भरलेलं आहे. वजनावर पुस्तकं विकण्याचा हा अभिनव असा उपक्रम.

श्रीमंतीचं प्रदर्शन! हे प्रदर्शन कुठल्या दालनात वगैरे भरत नसतं. आणि याला पैसेही मोजावे लागत नाहीत बरं का! हे समाजामध्ये फिरताना इथं-तिथं कुठंही बघायला मिळतं. श्रीमंती ही त्यांच्या राहणीमानातून तर प्रदर्शित होत असतेच, शिवाय समाजात वावरताना त्यांच्या देहबोलीचा ढंग, बोलण्याचा रंग, सोबतच्या चमच्यांचा संग यावरून त्यांची श्रीमंती आपोआप प्रदर्शित होत असते. काही जणांना नसलेल्या पोकळ श्रीमंतीच्या यंव आणि त्यंवच्या वल्गना करून वरपांगी प्रदर्शन करण्याची सवय असते. अशानं आपण ऐकणार्‍याच्या नजरेतून उतरू हे त्यांच्या गावीही नसतं. अलीकडे अंबानी कन्यकेने परिधान केलेल्या हिरेजडित साडीचं प्रदर्शन व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झालं होतं. ते पाहताना डोळे दीपले खरे, पण क्षणार्धात मन मात्र काजळलं. कारण एका बाजूला हिर्‍यात रमणारी कुटुंब आणि दुसर्‍या बाजूला उघड्या अंगाने रस्त्यावर फिरणारी कंगाल कुटुंब ही एकाच देशातील टोकाची विसंगती ठळकपणे जाणवली. असो.
भक्तीचं प्रदर्शन करणारे भक्त समाजामध्ये काही कमी नाहीत. देवाचा परमभक्त अशी आपली प्रतिमा बनवण्यासाठी ते धडपडत असतात. मोठेपणा आणि प्रसिद्धी मिळवण्याकरिता देवाला भरमसाठ ‘अर्पण’ देणारे हे ढोंगी भक्त कुटुंबात जन्मदात्यांच्याप्रती कर्तव्याची भावना नसणारे, पत्नीवर अन्याय करणारे, तुसडेपणाने वागणारे असे तर्‍हेवाईक असतात. देवाच्या दारात येऊन मोठ्या भावभक्तीचं प्रदर्शन करणार्‍यांची चीड येते, तशीच कीवही वाटते.

अंगप्रदर्शन! याला तर आता प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. कारण चित्रपटातील नट्या अंगप्रदर्शनाशिवाय कामच करू शकत नाहीत. साहजिकच नट्यांचं अनुकरण केलं जातं. नट्यांचं अंगप्रदर्शन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याचं प्रमाण १ः२ असं असतं. म्हणजे शरिराचा अंतर्भाग जेवढा जास्त उघडा त्याच्या दुपटीने दाम असं ते गणित असतं; पडद्यावरील अंगप्रदर्शन आज रस्त्यात उतरलेलं दिसतं. कारण ते नाही केलं तर आपली गणना गावंढळात केली जाईल अशीच आजच्या पोरींची मानसिकता बनलीय. टॉपच्या गळ्याची खोली जेवढी खाली तेवढी ती जास्त मॉडर्न असा त्यांचा समज असावा कदाचित. यावर आमच्या पिढीच्या म्हातार्‍यांनी घेतलेल्या आक्षेपावर त्यांचं उत्तर असतं- ‘आम्ही उघडे- नागडे कसेही फिरो तुमची नजर शुद्ध ठेवा.’ आता काय बोलणार??
त्या त्या प्रसंगी त्या त्या भावना साहजिकपणे व्यक्त होतात. म्हणजे आनंदाच्या प्रसंगी आनंद, दुःखद प्रसंगी दुःख! परंतु या दोन्ही प्रसंगी आनंद वा दुःख झालंच नसेल तर चारचौघात उसना आनंद किंवा दुःख प्रदर्शित करणं भाग पडतं. आमच्या परिसरातील एका महिलेचा व्यसनी, दुराचारी, व्यभिचारी, अत्याचारी पती निधन पावल्यावर खरं तर तिने मोकळाच श्वास घेतला होता. तिला त्याच्या जाण्याचं दुःखही झालं नव्हतं. परंतु सांत्वनासाठी भेटायला आलेल्या लोकांसमोर नक्राश्रू ढाळून दुःख प्रदर्शित करणं तिला जमेचना. शेवटी त्या त्या प्रसंगी त्या त्या भावनांचं प्रदर्शन टाळता येणं अटळच असतं.
आपलं जीवन हेही एक प्रदर्शनच नाही का? त्या जगन्नियंत्याने मांडलेलं! सर्वांच्या दैवाची दोरी आपल्या हातात धरून नाचवल्या जाणार्‍या आम्हा कळसूत्र्यांचं त्या विधात्यानं मांडलेलं हे निरंतर असं वैश्विक प्रदर्शनच तर आहे!