>> मुख्यमंत्र्यांची माहिती; शैक्षणिक कामगिरीचा घेणार आढावा; शिक्षण खात्याकडून विद्या समीक्षा केंद्राची होणार स्थापना
राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण खात्याने विद्या समीक्षा केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे केंद्र राजधानी पणजीत असेल व त्याद्वारे गोवाभरातील शाळांतील शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत प्रत्येक शिक्षकाचे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्याला ते त्यांच्या हातात पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
काल दोनापावला येथील राजभवन परिसरातील दरबार सभागृहात शिक्षण खात्याने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एनसीईआरटीचे संचालक शंभू घाडी आदी उपस्थित होते.
शिक्षण संचालनालयाच्यावतीने आयोजित 62 व्या राज्यस्तरीय शिक्षक दिन सोहळ्याची सुरुवातदीप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सरकार ‘विद्या समीक्षा केंद्र’ ही सर्वसमावेशक देखरेख प्रणाली सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. आगामी काळात कोणत्याही शाळेत कर्मचाऱ्यांची कमतरता राहणार नाही हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.
युवा पिढीला घडविण्यात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी करियरसाठी मार्गदर्शन करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. याशिवाय उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण अशा दोन्ही विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची व्याप्ती आणि संधी वाढविण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करीत आहे. या वचनबद्धतेचे उदाहरण म्हणजे राज्यभरातील सर्व आयटीआयमध्ये हॉस्पिटॅलिटी विषय केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सर्व प्रयोगशाळा लवकरच भारतीय विज्ञान संस्थेच्या अंतर्गत स्थापन केल्या जातील, असे सांगितले. गोव्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देणे हे सरकारचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले.
यावेळी गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय आणि सत्काम फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. पूरक विषय, मुख्य संकल्पना, केस स्टडी आणि भविष्यात त्यांना फायदेशीर ठरतील अशा पद्धतींवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अनुभव वाढविणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि भावना व्यक्त करणाऱ्या व्हिडिओ क्लिपही दाखविण्यात आल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आठही शिक्षकांना ‘मुख्यमंत्री – गुरू वशिष्ठ अर्थात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्वागत केले, तर शिक्षण उपसंचालक सिंधू प्रभू देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शंभू घाडी यांनी आभार मानले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
हर्षिता हरिश्चंद्र नाईक (सरकारी प्राथमिक शाळा, चोनसाई-पार्से)
सोनिया संजय माणगावकर (ए. व्ही. लॉरेन्सो सरकारी शाळा, मडगाव)
प्रेमानंद कुमू नाईक (केशव सेवा साधना शाळा, सर्वण-डिचोली)
आंतोनेत डिसोझा (अवर लेडी रोझरी हायस्कूल दोनापावला)
उमेशा देसाई (सरकारी हायस्कूल, फातर्पा-केपे)
डॉ. नीता गणपती साळुंखे (एल. डी. सामंत हायस्कूल, पर्वरी)
सुचित्रा राजीव देसाई (पॉप्युलर हायस्कूल, कोंब-मडगाव)
दत्ता परब (श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, पिर्ण)