प्रत्येकी २३६ कोटींचा जीएसटी पहिल्या तीन महिन्यांत जमा

0
128

राज्यात जीएसटीअर्तंगत २०१८ – १९ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यात प्रत्येकी २३६ कोटी रुपयांचा कररुपी महसूल मिळाला आहे. राज्यातील घटणार्‍या जीएसटी कराचा अभ्यास करण्याची गरज आहे, अशी माहिती राज्य जीएसटी आयुक्त दीपक बांदेकर यांनी काल दिली.

केंद्रीय जीएसटी आयुक्त आणि राज्य जीएसटी आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बांदेकर बोलत होते. या आर्थिक वर्षात प्रतिमहिना २६९ कोटी रुपये कर गोळा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
या आर्थिक वर्षात करात १४ टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे. परंतु, मागील तीन महिन्यात २६९ कोटीचे उद्दिष्ट गाठण्यात यश प्राप्त झाले नाही. मागील २०१७ -१८ या आर्थिक वर्षात प्रतिमहिना २३६ कोटी रुपये कराचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात २०० कोटी रुपये करा गोळा झाला होता, असेही बांदेकर यांनी सांगितले.

राज्यात जीएसटीचा चांगला प्रभाव दिसून येऊ लागला आहे. परतावा भरणार्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जीएसटीमुळे सध्या राज्याचा महसूल कमी होत आहे. मागील वर्षभरात कर भरणार्‍यांच्या संख्येत १५ हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, असेही बांदेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पंचायत मंत्री तथा जीएसटी मंडळाचे सदस्य मावीन गुदिन्हो, केंद्रीय जीएसटी आयुक्त के. अनपाझकान, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संदीप भंडारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

हॉटेलच्या खोल्यांच्या ७५०० रुपयांवरील भाड्यासाठी आकारला जाणारा २८ टक्के जीएसटी कर १८ टक्क्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही पंचायत मंत्री तथा जीएसटी मंडळाचे सदस्य मावीन गुदिन्हो यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.