>> विधानसभेत अभिनंदनाचा ठराव
गोव्याच्या विकासात माजी मुख्यमंत्री व आमदार प्रतापसिंह राणे यांचे मोठे योगदान आहे. राजकीय नेता कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापसिंह राणे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रतापसिंह राणे यांनी काल विधानसभेत काढले. राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधानसभेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मांडलेल्या अभिनंदनपर ठरावावर मुख्यमंत्री बोलत होते.
सभापती राजेश पाटणेकर यांनी राणे हे एक अजातशत्रू व निष्कलंक व्यक्तीमत्व असल्याचे सांगितले. गोवा मुक्तीनंतर गोव्यात जे नवे नवे कायदे तयार झाले, ते तयार करण्यात प्रतापसिंह राणे यांचा हात होता. गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला तो राणे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत, असे लुईझिन फालेरो म्हणाले.
रवी नाईक यांनी राणे यांची गोव्यातच नव्हे तर देशभरात विकासपुरुष अशी ओळख असल्याचे सांगितले. ते कुशल प्रशासक असल्याचे नाईक म्हणाले. प्रतापसिंह राणे हे एक ‘जंटलमन’ मुख्यमंत्री होते, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगून त्यांनी केलेल्या कार्यकतृत्वाचा आढावा घेतला.
राणे यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कार्याचा मंत्री मायकल लोबो यांनी आढावा उल्लेख केला. पाणीपुरवठा असो अथवा रस्त्यांचे जाळे, त्यांनी केलेले कार्य मोठे असल्याचे लोबो म्हणाले. राणे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना १०० वर्षांसाठीचे नियोजन करून गोव्यात मोठे प्रकल्प आणले. विविध प्रकल्पांसाठी त्यावेळी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केली होती. नंतर त्या जमिनीवर मोठे प्रकल्प उभारता आल्याचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. राणे हे अखंडपणे गेली ५० वर्षे विधानसभेवर निवडून येत असल्याने ते केवढे मोठे नेते आहेत, हे सिद्ध होत असल्याचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर म्हणाले.
वारसा पुढे नेण्याचे
आव्हान : विश्वजित
लहानपणापासून वडिलांची राजकीय कारकिर्द पाहत मोठा झालो. दर निवडणुकीत त्यांचे मताधिक्क्य वाढतच गेले. लोकांचा आजही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार असल्याचे मंत्री तथा राणे यांचे सुपुत्र विश्वजित राणे म्हणाले.
आमदार एलिना साल्ढाणा म्हणाल्या की, राणे हे एक मोठे व चारित्र्यवान नेते असल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यावेळी बोलताना म्हणाले की, ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले त्या सत्तरीतील मतदारांचे अभिनंदन करायला हवे. सत्तरीत आज जो मोठा विकास झालेला आहे, त्याचे श्रेय राणे यांनाच द्यावे लागणार असल्याचे कामत म्हणाले.
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी राणे यांच्याकडून आपण खूप काही शिकलो आहे. गोव्यातील वनक्षेत्र आतापर्यंत सुरक्षित आहे, त्याचे श्रेय राणे यांना द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
मंत्री फिलिप नेरी, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, आमदार प्रसाद गावकर, बाबुश मोन्सेर्रात आदींची राणे यांचा गौरव करणारी भाषणे झाली.
जनतेची सेवा करा : राणे
अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना प्रतापसिंह राणे म्हणाले की, जे लोक तुमच्याकडे कामे घेऊन येतील तर त्यांना मदत करा. तसे केले तर तुम्हीही आपल्याप्रमाणे दीर्घकाळ निवडून येऊ शकतात.