माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी काल रविवारी सकाळी ट्विट करून दिली. मात्र अद्यापही प्रणवजींना व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूची दि. १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी कोमात गेले असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्विटद्वारे आपल्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली.