… प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिः अभाषत

0
216

– प्रा. रमेश सप्रे
‘समुपदेशन गीतेतून’ असं म्हणताना समुपदेशन म्हणून भगवान श्रीगोपालकृष्णच डोळ्यासमोर उभे राहतात आणि अर्जुन हा ते समुपदेशन स्विकारून त्यावर चिंतन करणारा ‘शुभार्थी’ म्हणून आपल्यासमोर येतो. जो कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीत आहे. गोंधळलाय – गांगरलाय तो आपल्या शुभा(कल्याणा)साठी एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडे समुपदेशनासाठी जातो. अशाला ‘शुभार्थी’ म्हटलं जातं. अर्जुन असा शुभार्थी आहे. आपणही गीतेच्या वाचन-मनन-चिंतनातून असं बनण्याचा संकल्प करू या. गंमत म्हणजे असं करण्यात भगवंत किंवा महर्षि व्यास यांचं हित नसून आपलंच हित आहे. असो.‘विश्‍वरूप दर्शन’ हे अकराव्या अध्यायाला दिलेलं नाव अत्यंत अर्थपूर्ण आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ‘कृष्णार्जुन संवादे’ असं गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असलेल्या संकल्प वाक्यात येतं. अर्थात हा अत्यंत उत्स्फूर्तपणे गुरु-शिष्य किंवा दोन जिवलग सखे यांच्यात झालेला हितगूज स्वरूपाचा संवाद आहे. प्रसंग अत्यंत आणीबाणीचा आहे. धनुष्यबाण फेकून ‘न योत्से’ म्हणजे ‘मी लढणार नाही’ असं निग्रहपूर्वक सांगणार्‍या व मटकन् खाली बसलेल्या ‘शोकसंविग्न मानस’ म्हणजे शोक-दुःख-विषाद यांनी पूर्ण भरलेल्या मनःस्थितीतल्या अर्जुनाला पुन्हा आत्मविश्‍वासानं उभं करून त्याच्याकडून युद्ध करण्याचाच नाही तर युद्ध जिंकण्याचा पराक्रम करून घ्यायचाय… यासाठी या हृदयातलं त्या हृदयात घातलं अशा प्रकारचा संवाद आवश्यक आहे. अन् रणांगणावर कोणत्याही क्षणी युद्धाचा शंख फुंकला जाईल अशा अवस्थेत असा हितसंवाद हा जिव्हाळ्याचा म्हणूनच अनौपचारिक असणार आहे. त्यात एवढे तत्त्वज्ञानाचे प्रश्‍न आलेही नसतील. पण शेवटी या संवादाचं बोलण्यातलं शब्दांकन ‘संजय उवाच’ या स्वरूपाचं आहे. तर लिखित रुपातलं शब्दांकन महर्षि व्यासांचं आहे.
महाभारत या शतसाहस्त्री संहिता म्हणजे एक लक्ष श्‍लोक असलेल्या महान ग्रंथाचा (केवळ महाकाव्याचा नाही!) विकास तीन टप्प्यात झाल्याचं मानलं जातं. सर्वप्रथम व्यासांनी युद्धानंतर लिहिलेल्या ‘जय’ नावाचा सुमारे आठ हजार श्‍लोकांचा ग्रंथ होता. व्यासांच्या शिष्यांनी निरनिराळ्या यज्ञ प्रसंगी – मध्यंतराच्या काळात निवेदन करून, श्रोत्यांच्या प्रश्‍नांना उत्तरं देऊन, त्यांची जिज्ञासा पुरी करून या ग्रंथाचा विस्तार सु. २४००० श्‍लोकांचा झाला. यात महत्त्वाचा वाटा वैशंपायन ऋषींचा होता. तर आजच्या महारूपात म्हणजेच एक लाख श्‍लोकसंख्या असलेल्या महाभारताचा आकार सौती तसेच अन्य सूतांनी म्हणजे पुराणिकांनी पुराणग्रंथ निवेदन करून सद्धर्माचा प्रसार करणार्‍यांनी अस्तित्वात आणला.
काही संशोधकांनी या तीन टप्प्यांप्रमाणे महाभारतातील गीतेचाही विस्तार होत गेला असा विचार मांडलाय. ‘त्रिकाल गीता’ म्हणून शिक्षणतज्ज्ञ श्री. ग. श्री. खैर यांचा ग्रंथ आहे. यात संशोधनापेक्षा लेखकाचं स्वतःचं चिंतन अधिक दिसून येतं. विशेष म्हणजे वेगवेगळ्या काळात गीतेत समाविष्ट झालेल्या श्‍लोकांची वा अध्यायांची छपाई तीन रंगात केली आहे. त्यामुळे प्रत्येक अध्यायाला स्वतंत्र योगाचं नाव नि शेवटी संकल्पवाक्य अशी रचना प्रत्यक्षात आली. वेगवेगळ्या गीताग्रंथात निरनिराळी नावंही आढळतील. पू. विनोबांसारखे गीताप्रवचनकार तर संवाद अखंड असल्याप्रमाणे विवेचन करतात किंवा अधुनमधून स्वतः दिलेलं नाव अध्यायाला सुचवतात. उदाहरणार्थ – शेवटच्या अठराव्या अध्यायाला ‘मोक्षसंन्यास’ योग असं पारंपरिक नाव असलं तरी पू. विनोबा भगवंताचा ‘प्रसाद योग’ असं अर्थपूर्ण त्याचं वर्णन करतात. कारण गीतेच्या अर्जुन कपाळाला हात लावून दुःखी होऊन बसतो त्याला ‘अर्जुनविषाद’ योग असं नाव आहे. तोच अर्जुन हळुहळू उठत म्हणजे मनाची उभारी घेत शेवटी ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादान्मयाच्युत’ असं म्हणत युद्धाला प्रवृत्त होतो. म्हणजे हा अर्जुनाला लाभलेला भगवंताचा ‘प्रसाद’च नव्हे काय? अन् आपणा सर्वांवर भगवंताची कृपा!
हे सगळं लिहायचं कारण अनेकांना एक प्रश्‍न नेहमी सतावत असतो की एखाद्याशी बोलताना (श्रीकृष्णार्जुन संवादे) ‘आता हा या नावाचा पहिला अध्याय संपला बरं का! आता दुसर्‍याकडे वळू या’. …असं कोण म्हणेल का? …त्याचं सरळ उत्तर हे आहे की अर्थातच असं औपचारिक बोलणं संवादात अन् तेही रणभूमीवर युद्ध सुरू होण्यापूर्वी शक्यच नाही. पण महाभारतातच सांगितलंय की संजयानं धृतराष्ट्राला हा कृष्णार्जुनसंवादाचा ‘गीता’ नामक वृत्तांत कथन केला. भगवंताची वाणी असल्यानं गीतेला भगवद्गीता म्हणू लागले नि यातील सारसंदेश त्रिकालाबाधित (युनिव्हर्सल) म्हणजेच सर्वांसाठी व सर्व काळासाठी उपयुक्त असल्याने गीतेला ‘श्रीमद्भगवद्गीता’ असं म्हणू लागले. असो.
एक महत्त्वाची गोष्ट गीतेच्या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. गीतेचा प्रवाह नवव्या अध्यायापर्यंत पोचल्यावर अर्धा प्रवास पूर्ण झाला असं मानण्यात येतं. दहावा अध्याय सुरू करण्यापूर्वी अनेक विवरणग्रंथात पहिल्या नऊ अध्यायांचं संक्षिप्त स्वरूपात ‘सिंहावलोकन’ (आढावा) केलं जातं. दहावा अध्याय सुरू होतो तोच कथाकथनासारखा ‘विभूतियोग’. ‘मी तुला कुठं कुठं पाहू?’ या अर्जुनाच्या भाबड्या प्रश्‍नाला भगवंताचं मार्मिक उत्तर आहे – ‘तू मला कुठंही पाहू शकतोस. मी जर कणाकणात अणुरेणूत आहे तर कुठंही दृष्टी फिरवली तरी मी दिसलोच पाहिजे’. असं म्हणून भगवंत अर्जुनावरच्या स्नेहामुळे विविध क्षेत्रातली, जीवनाला वेगवेगळ्या पातळ्यांवर स्पर्श करणारी अनेकानेक उदाहरणं देतात. शुभमंत्रापासून ते कुटिल कपटापर्यंत (‘कपटकारस्थानं करून छळणार्‍या, फसवणार्‍या गोष्टीतही मी आहेच. – छलयताम् द्यूतम् अस्मि|’) सर्वांत सर्वत्र सर्वकाळी भगवंताचं ‘दर्शन’ घेता येतं. याचा अर्थ शरीराच्या डोळ्यांनी अशा उघड उघड अमंगळ गोष्टीत भगवंताचं अस्तित्व कसं मानायचं? ‘सर्व रसात मी आहे’ असं म्हटल्यावर अमृत, दूध यात भगवंत आहे हे सहज पटू शकतं पण विषारी द्रव पदार्थात अगदी दारूत नि विषातसुद्धा परमेश्‍वराचं अस्तित्व पाहायचं नि नतमस्तक व्हायचं हेही भगवंताचं दर्शनच आहे. पण हे अंतःचक्षूंनी – आतल्या डोळ्यांनी (इनसाइट) म्हणजेच विचार, चिंतन करून घेतलेलं (दिव्यदृष्टीनं घेतलेलं) भगवंताचं दर्शन आहे. विश्‍वरूप दर्शनही असंच घ्यायचं असतं.
दर्शनाचा वरचा, देहदृष्टीनं असलेला साधा अर्थ आहे ‘पाहणं’. पण सूक्ष्म दृष्टीनं ‘चिंतन करणं’ हाच अर्थ भगवंताला नि व्यासांना अभिप्रेत आहे. आपणही अशाच अंतर्दृष्टीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
अनेक विवरण करणार्‍या गीता ग्रंथात दहाव्या अध्यायातील भगवंताच्या प्रत्येक विभूतीचं स्पष्टीकरण करताना अनेक संदर्भ दिलेले असतात, गोष्टी सांगितलेल्या असतात. अशा मनोरंजक पार्श्‍वभूमीनंतर डोळ्यांना दिपवून मनाबुद्धीला चालना देणारा ‘विश्‍वरूपदर्शना’चा अकरावा अध्याय सुरू होतो. जणू शिष्य अर्जुन एक नि त्याच्यावर जगद्गुरु भगवान् कृष्ण एक असा एकावर एक अकरा हा अध्याय आरंभ होतो.
सुरुवातच मुळी अर्जुनाच्या मोकळ्या मनानं दिलेल्या कबूलीनं होते. अर्जुन म्हणतो ‘तुझ्या(अतिशय मनोरंजक आणि प्रभावी) शब्दांनी माझा मोह गेला (यत् त्वयोक्तं वचः तेन मोहोऽयं विगतो मम॥ खरं तर गीतोपदेश इथं संपायला हवा होता. ‘माझा मोह गेला’ असं आत्मविश्‍वासानं अर्जुनानं म्हणणं नि उठून युद्ध करणं (उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्‍चयः|) असं घडायला हवं होतं. पण ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेणे असं म्हणतात त्याप्रमाणे भगवंत जर फुलून, उत्साहानं भरभरून बोलतोय तर आपण आणखी इच्छा पुरी का करून घेऊ नये – अशा विचारानं अर्जुन म्हणतो ‘द्रष्टुमिच्छामि ते रुपम् ऐश्‍वरम् पुरुषोत्तम॥ म्हणजेच हे भगवान् श्रीकृष्णा तुझं ते ऐश्‍वर्ययुक्त असं दिव्य रूप बघण्याची माझी इच्छा आहे.
वासराची दूध पिण्याची इच्छा जशी माऊली गाय आनंदानं पूर्ण करते नि असं करताना स्वतः ही धन्यतेचा, समाधानाचा अनुभव घेते तसंच भगवंताचं झालंय. उत्स्फूर्तपणे रूप दाखवायला लगेच सुरवात केल्यावर अर्जुनाचे डोळे त्या दिव्य तेजानं दिपून जातात, त्याला काहीच दिसत नाही. भगवंताला आपली चूक लक्षात येते. अत्यंत अधीरपणे आपण अर्जुनाला विश्‍वदर्शनासाठी आवश्यक अशी दिव्य दृष्टी न देता विश्‍वरूप प्रकट केलं हे चूक आहे हे लक्षात येऊन भगवंत अर्जुनाला म्हणतात – ‘दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैष्वरम् |११|८.. अरे अर्जुना माझं ऐश्‍वर्यानं ओतप्रोत भरलेलं विश्‍वरूप पहा. त्याचा अनुभव घे नि त्याच्यावर चिंतन कर.
ते सगळं उलगडत जाणारं भव्यदिव्य रूप पाहून अर्जुनाची पहिली प्रतिक्रिया ही नम्रतेची, लीनतेची झाली. त्याला अत्यंत आश्‍चर्य वाटलं. त्या अद्भुत दृश्याच्या अपूर्व अनुभवानं तो रोमांचित झाला (विस्मयाविष्टो हृष्टरोमा). त्याला काहीही सुचेना. नुसता खाली मान घालून, नतमस्तक होऊन त्या विश्‍वरूपाचं वर्णन करू लागला.
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः|
प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिः अभाषत॥
‘अभाषत’ म्हणजे बोलू लागला. पण अर्जुनाचं हे ‘साधं बोलणं’ नव्हतं तर तो विश्‍वरूपाचं वर्णन स्वानुभवानं करु लागला. या स्तोत्रासारख्या वर्णनात समुपदेशन भरून राहिलंय. भगवंत आणि सद्गुरु यांच्या कृपेनं त्यावर सहचिंतन करुया…
* पश्यामि देवान् तव देव, देहे सर्वान् देवान् तथा भूतविशेषसंघान् – म्हणजे हे देवा (परमेश्‍वरा), तुझ्या शरीरात सर्व देवांना तसंच अनेक प्राणिमात्रांच्या समुदायांना पाहतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे. सर्व देवाना मी तुझ्यात पाहतोय म्हणजे सर्व देवात एकच तू परमेश्‍वर आहेस याचा मला प्रत्यय येतोय. ‘तेहतीस कोटी देव’ अवश्य मानू या पण या सर्वांच्या अंतरंगात असलेल्या एकेश्‍वरी दिव्यत्वाचा अनुभव घेऊ या. तो कमलासनस्थ ब्रह्मदेव, तो सर्वसंहारक शंकर तसेच इतर देवदेवता, ऋषीमुनी यांच्यात तोच परमेश्‍वर पाहायचा. डोळ्यांना दिसणारे वा न दिसणारे जीवजंतू, सर्व जलचर, उडणारे पक्षी नि जमिनीवर राहणारे असंख्य प्राणी यांच्यातही परमेश्‍वराचं दर्शन घ्यायला हवं. अगदी विषारी विषाणूत (व्हायरस) नि निर्जीव भासणार्‍या स्थाणूतही (खांबातही) त्या महाविष्णूचं – परमदेवाचं – दर्शन घ्यायचा – जिवाणू – किटाणू – विषाणू यांतील विष्णुतत्त्वाची जाणीव ठेवून त्याप्रमाणे व्यवहार केला. ज्या राक्षसांना, असुरांना भगवंतानं विविध अवतार घेऊन मारलं त्यांची आत्मज्योती भगवंताच्या आत्मज्योतीत विलीन झाली असे उल्लेख आपल्या ग्रंथातून वारंवार येतात.
* अनेक बाहूदर वक्त्रनेत्रम् पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरुपम् – ‘भगवंता तुझ्या या विश्‍वरूपाला असंख्य हात पाय, डोळे कान नाक इ. इ. अवयव मी पाहतोय’. या अर्जुनाच्या म्हणण्यात खूप अर्थ आहे. देवीला सोळा हात असतात नि त्या हातात निरनिराळी शस्त्रास्त्रं असतात. असं आपण सहज म्हणतो. पण गृहलक्ष्मीला – घरातल्या स्त्रीला – (माता-भगिनी-पत्नी इ.) एकाच वेळी अनेक कामं (मल्टीटास्किंग) करावी लागतात त्यावेळी तीही दशभुजा किंवा शतभुजाच असते. तिच्यात भगवंताचं दर्शन व्हायला नको का? – अवश्य व्हायला हवं. नव्हे व्हायलाच हवं.
तुला असंख्य हातपाय – कानडोळे – पोटंतोंडं आहेत याचा जीवनातला अर्थ सोपा आहे समजायला – पण त्याप्रमाणे वागायला, जगायला मात्र खूप कठीण आहे. आपण अनेक ग्रंथात, मंदिराच्या भिंतींवर अशा अनेक हातपाय इ. असलेल्या विश्‍वरूपाचं दर्शन घेतो. नाटका-चित्रपटातही युक्ती वापरून (ट्रिक सीन्स) विश्‍वरूप दर्शन घडवलं जातं. पण ते चित्रदर्शन झालं. जीवनदर्शन कसं घ्यायचं. आपल्या अवतीभवती असलेल्या सर्व प्राण्यांचे – पक्ष्यांचे त्याहिपेक्षा सर्व थरातील, गटातील व्यक्तींचे हातपाय – तोंडंपोटंही भगवंताची आहेत याच्या जिवंत जाणीवेनं सर्वांची सेवा करुया. एखाद्या श्रीमंत वस्तीतील, आलिशान इमारतीत राहणार्‍यांची सेवा करणं सोपं आहे. पण गलिच्छ वस्तीत, झोपडपट्टीत जाऊन तेथील दुर्दैवी जिवांची सेवाशुश्रुषाही आग्रहानं नि आदरानं केली पाहिजे. भगवंताना हे दाखवून द्यायचंय – की ‘मानवसेवा हीच माधवसेवा!’ आजुबाजूला एवढी भूक असताना नुसते पंचपक्वान्नांचे नैवेद्य भगवंताच्या मूर्तीपुढे दाखवणं; एवढे उघडे नागडे देह असताना देवाच्या मूर्तींना रेशमी जरीची वस्त्र शिवून पांघरत राहणं यात कसली भक्ती आहे? – विचार करुया.- स्वामी विवेकानंदांनी हेच सत्य प्रभावी शब्दात सांगितलंय आपल्याला ध्येय मंत्र दिलाय .. जगाच्या, मानवतेच्या सेवेतूनच आत्मसाक्षात्कार होईल. ॥ आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च॥ विश्‍वरूप दर्शनाचा संदेशही हाच!!