- ऍड. पांडुरंग नागवेकर
गोव्याच्या मुक्तीलढ्यात असंख्य ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान राहिले आहे. पोर्तुगीजधार्जिण्यांना पुस्तकातून बॉम्ब असलेली पार्सले पाठवून जरब बसवणारे चिंचोणे येथील पॉलीकार्पो दा सिल्वा हे असेच एक वीर. आजच्या गोवा मुक्तिदिनानिमित्ताने त्यांचे स्मरण –
आंतोनियो रुझारिओ पॉलिकार्पो तेओदोसिओ दा सिल्वा ऊर्फ पॉली हे चिंचोणे या गावचे सुपुत्र. मोठ्या कर्तृत्वामुळे ते गोमंतकाचे व भारतमातेचे सुपुत्र बनले. त्यांचे पूर्वज चिंचोणे गावचे मुख्य वांगडी. प्राचीन काळी ज्या मूळ आठ वांगड्यांनी चिंचोणे गाव वसवून शेतजमीन पिकावळीखाली आणली व चिंचोणे गावकारी ग्रामसंस्था स्थापन केली, त्यापैकी त्यांचे एक पूर्वज होते. या आठ वांगड्यांपैकी सात वांगडी हे क्षत्रिय मराठा वर्गातले होते व त्यांचे उपनाम गावस असे होते, तर शेवटचा वांगडी हा मिठ गावडो वर्गातील होता व त्याचे उपनाम नाईक असे होते.
पोर्तुगिजांनी चिंचोणे गाव कब्जात घेण्यापूर्वी तिथे वेताळ, सातेरी, भाविकादेवी व आग्यावेताळ अशी मंदिरे होती. गावस वर्गाची कुलदेवता सातेरी होती. पॉलीचे पूर्वज हे गावस उपनामाचे होते असे दिसते.
चिंचोणे हा गाव सासष्टी तालुक्यात येतो. इ. स. १५४३ मध्ये पोर्तुगिजांनी सासष्टी तालुक्यावर आक्रमण करून जेजुईट पाद्य्रांनी तेथील २६७ हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करून टाकली व तेथे चर्च उभ्या केल्या. या गावात मागीलवाडो नावाचा एक वाडा आहे, तेथे पुरातन तळीच्या चार मीटर खोलगट जागेत नंदीवर विराजमान शंकराची पाषाणी मूर्ती सापडली, ती सध्या जुन्या गोव्यातील केंद्रीय वस्तूसंग्रहालयात आहे. इ. स. १५९० मध्ये पोर्तुगिजांनी जेजुइटांच्या मदतीने चिंचोणे गावी चर्च उभारली, तिचे नाव इगर्जा दे नोस्सा सिन्होरा दे एस्पेरान्झा असे होते. स्वातंत्र्यानंतर तिचे नाव अवर लेडी ऑफ होप असे ठेवण्यात आले. सदर चर्चमध्ये इ. स. १६१० मध्ये ख्रिस्ती पाद्य्रांनी प्रथम धार्मिक प्रवचन आयोजित केले. त्या प्रवचनानंतर चिंचोणेतील ३०० गावकर्यांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला व चिंचोणे हा गाव पूर्ण ख्रिस्ती बनला.
चिंचोणे गावातील मूळ क्षत्रिय गावस गावकर कुटुंबात पॉलीचा जन्म ७ डिसेंबर १९२७ रोजी झाला. त्याच्या वडिलांचे नाव सांताना दे सिल्वा असे होते. प्राथमिक मराठी शिक्षण पूर्ण केल्यावर गावातील हायस्कूलमध्ये मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण घेून त्यांनी पुणे बोर्डाची मॅट्रिकची परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले. त्या काळी मुंबईत वास्तव्य करून एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी ते मिळवू शकले असते, परंतु मुळात देशप्रेम व राष्ट्रभावना अंगवळणी पडल्याने त्यांनी भूमीगत स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. अहिंसेवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी हाती बंदूक घेऊन गोमंतकातील पोर्तुगीज राजसत्ता उलथवण्यासाठी ते कार्यरत राहिले. इ. स. १९५४ मध्ये त्यांनी आझाद गोमंतक दलात प्रवेश मिळवून गोवा मुक्तीचे कार्य सुरू केले. या निधड्या छातीच्या स्वातंत्र्यवीरावर आझाद गोमंतक दलाने अनेक कामगिर्या सोपविल्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या.
आजेन्तो कासिमिरो मोन्तेरो हा गोव्यात स्थायिक झालेला पोर्तुगीज पुरूष व येथील मुसलमान स्त्री यापासून जन्माला आलेला. अशा लोकांना मिस्तीज म्हटले जाई. गोव्यातील परकीय चलन भारतात चोरट्या मार्गाने पाठवून त्याने फार मोठी संपत्ती जमा केली होती. या चोरट्या व्यापारासाठी त्याने सीमेपलीकडे अनेक एजंट पोसले होते. गोव्याच्या सीमेवरील लोकांवर त्याने भयंकर अत्याचार केले. सदर स्मगलिंगच्या व्यवहारात त्याने अनेक खून पाडले. सत्याग्रहींना व स्वातंत्र्यसैनिकांना पकडून क्रूरपणे छळले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांचा छळ करून त्यांची हत्याही केली. तो गोव्यातील पोर्तुगीज शासनाचा एनकाऊंटर स्पेशालिस्ट होता!
इ. स. १९५६ मध्ये पोर्तुगीज सरकारने मासियल चावेस या पोर्तुगीज अधिकार्याला गोव्याच्या वनखात्याचा प्रमुख नेमले. वनक्षेत्रातील बेकायदा वृक्षकत्तलीला रोखण्यासाठी मासियलने अनेक उपाययोजना केल्या. प्रो. विश्वनाथ मुळगावकरांच्या नावे भाडेपट्टी कराराद्वारे असलेल्या सरकारी जंगलाची स्वतः पाहणी करण्यासाठी मासियल हा मुळगावकरांसमवेत एक दिवस जंगलात गेला. सदर जंगलात त्याच्यासमवेत मोंतेरो देखील असणार याचा सुगावा स्वातंत्र्यसैनिकांना लागला. त्यांनी एक योजना आखून मोंेतेरोचा नायनाट करण्याचे ठरवले.
वरील मंडळी दि. २७ एप्रिल १९५६ रोजी संध्याकाळी जंगलात फिरत असताना स्वातंत्र्यसैनिकांनी मोंतेरो समजून मासियल चावेसवर गोळीबार केला. त्यात तो गतप्राण झाला तर मुळगावकर जबर जखमी झाला. पुढे मोंतेरोने स्वातंत्र्यसैनिकांची धरपकड सुरू केली. त्यात माशेल येथील वखारीचे मालक श्री. कृष्णा परब हे नाहक पकडले गेले. मोंतेरोने हाल हाल करून त्यांना ठार मारले. १९५८ मध्ये मोंतेरो पोर्तुगालचा हुकूमशहा सालाझारच्या बोलावण्यावरून पोर्तुगालला गेला. त्यावेळी तिथे पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यात सालाझारचा आलमिरान्ते तोमास नावाचा उमेदवार त्याच्या सत्ताधारी पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवीत होता, तर विरोधी पक्षातर्फे जनरल ह्युबर्ट देलगादो हा निवडणुकीच्या रिंगणात होता. जनरल देलगादोने निवडणूक प्रचारात असे जाहीर केले की, जर तो निवडणूक जिंकून पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष झाला तर सालाझार सरकार बरखास्त करून त्यावर न्यायालयात खटला चालवील.
जनरल देलगादो निवडणूक हरला. त्यानंतर सालाझारच्या सांगण्यावरून आजेंत मोंतेरोने पोर्तुगाल – स्पेन सीमेवर जनरल देलगादोचा खून केला. पुढे पोर्तुगीज सरकारने मोंतेरोची नेमणूक मोझांबिक या आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीत केली. तिथून तो दक्षिण आफ्रिकेत गेला. त्याने स्पेनमधील सुधारणावादी लढ्यात भाग घेतला. यावेळी त्याला फ्रान्स सरकारचा पगार मिळत होता. त्यानंतर दि. २५ एप्रिल १९४४ रोजी दक्षिण आफ्रिकेत राज्यक्रांती झाली, त्यात ऍपारथेड पक्ष सत्तेवर आल्यावर त्या सरकारने मोंतेरोची त्यांच्या हुकूमशाली पोलीस पथकात नेमणूक केली. असा हा मोंतेरो हा एक क्रूरकर्मा होता. तो गोव्यात असताना त्याचा गोव्यातील नामांकित न्यायमूर्तींवरदेखील प्रभाव होता. उदा. पणजीच्या मिलिटरी न्यायालयाचा तत्कालीन न्यायाधीश मिलितांव क्वाद्रूश हा स्वातंत्र्यसैनिकांत अप्रिय झाला होता, कारण त्याने निष्पाप स्वातंत्र्यसैनिकांवरील खटल्यात त्यांना विनाकारण जन्मठेप सुनावली होती. आजेंत मोंतेरोची सदर न्यायाधीशाच्या कक्षात उठबस होती. मोंतेरो न्यायाधीशाच्या केबीनमध्ये आरामखुर्चीत बसून टेबलवर बुटांचे पाय घेऊन आराम करायचा. न्यायाधीश मिलितांव क्वाद्रूश मोंतेरोला घाबरत असे. त्याच्याच सांगण्यावरून शिक्षा सुनावत असे.
शेवटी चिंचोणेचे आपले शूर स्वातंत्र्यसैनिक पॉली सिल्वा यांनी सदर न्यायाधीशाला धडा शिकवायचे ठरवले. त्या न्यायाधीशालाच नव्हे, तर मोंतेरोलाही जन्माची आठवण राहील असा धडा शिकवण्याचा त्यांनी चंग बांधला.
पॉली यांनी लाइफ बाय मारिलेंको नावाची पाच सहा पुस्तके विकत घेतली. सदर पुस्तक त्या काळात फार नावाजलेले होते. या प्रत्येक पुस्तकात त्याने पार्सल बॉम्ब पेरले आणि ते प्रत्येक पुस्तक टीएमटी जज जुझे जॉकीम मिलितांव दे क्वाद्रूश, पणजीचे प्रशासक जुझे फोर्तुनातो दे मिरांदा, सुप्रसिद्ध उद्योजक दामोदर मंगलजी, पेडण्याचे व्हायकाऊंट काका देशप्रभू आणि आजेंतो दे पालासिया कासिमिरो मोंतेरो या पाचही जणांना १० एप्रिल १९५६ रोजी जे. गॉसालो डायस हे खोटे नाव स्वतः धारण करून पोस्टातून पाठवले.
न्यायमूर्ती मिलितांव क्वाद्रूश याला दि. १२ एप्रिल ५६ रोजी पणजीच्या मिलिटरी न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या केबीनमध्ये सदर पुस्तकाचे पार्सल मिळाले. त्याने पार्सल फोडून पुस्तकाचे शीर्षक वाचले. ते पुस्तक त्याच्या आवडीचे होते म्हणून त्याने ते स्वतःच्या हाताने उघडले मात्र, लगेच कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. न्यायाधीश बेशुद्ध पडला. त्या बॉम्बस्फोटात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. त्याला कायमचे बहिरेपण आले. तेव्हापासून न्या. क्वाद्रूश दोन्ही हातांना हातमोजे घालून न्यायदान करायचा. दि. १२ एप्रिल १९५६ रोजी पणजीत बॉम्बस्फोट झाल्याची वार्ता गोव्यात सर्वत्र पसरल्याने उर्वरित चौघांना पार्सल बॉम्ब पाठवण्यात आले होते ते सावध झाले व त्यांनी ते पार्सल उघडले नाही. त्यामुळे ते सर्वजण सुखरूप बचावले.
मोंतेरोने या पार्सल बॉम्ब पाठवणार्याचा शोध घेण्याची मोठी मोहीम हाती घेतली. पॉली पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गोव्याबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते, परंतु १ जून १९५६ रोजी मोंतेरोच्या पोलिसांनी त्यांना जिवंत पकडले. नंतर कैदखान्यात टाकून यथेच्छ झोडपून शरीराचा चेंदामेंदा केला. त्यांचा अनन्वित छळ केला. त्यानंतर त्यांच्यावर पणजीच्या मिलिटरी न्यायालयात खटला भरण्यात आला. खुनाचा प्रयत्न, देशद्रोह असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले.
दि. २१ जुलै १९५८ रोजी मिलिटरी न्यायालयाने त्यांना २८ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्याला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन माफीनामा देण्यास सांगितले व त्यानुसार शिक्षेत सूट देण्याची तयारी दर्शवली, परंतु या शूर व निधड्या छातीच्या स्वातंत्र्यवीराने न्यायमूर्तींनी दिलेली संधी धुडकावली व उलट न्यायाधीशाला सुनावले की, तुम्ही दिलेली २८ वर्षांची शिक्षा फारच अपुरी आहे, तेव्हा ती पन्नास वर्षे करावी!
सुदैवाने गोवा १९६१ साली मुक्त झाला आणि पॉली यांची कैदेतून सुटका झाली. त्यांनी फक्त दोनच वर्षे शिक्षा भोगली. कैदेत छळाला सामोरे जावे लागल्याने शरीर थकले होते. चिंचोणेत कुटुंबियांसमवेत त्यांचे वास्तव्य होते. पणजीचे सुप्रसिद्ध व्यापारी व उद्योजक श्री. अरूण नारायणदास यांनी मला पॉली यांची ही हकीकत एक दिवस सांगितली. ते त्यांचे जवळचे मित्र होते. पॉली यांना मुक्तीनंतर सरकारी नोकरी मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना घेऊन नारायणदास तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले. त्यांना सरकारी अथवा पोलीस खात्यात नोकरी देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले, परंतु अरुण नारायणदास यांनी प्रयत्न करून देखील पॉलींच्या पदरात सरकारी नोकरी पडली नाही. शेवटी ते हताश झाले. पॉलींना थकवा आला. अनेक व्याधींनी जखडले आणि दि. २७ ऑक्टोबर १९७७ रोजी त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. अशा या स्वातंत्र्यवीरास आमचा शतशः प्रणाम!