पैंगीण येथे २८ पासून लोक माहिती अभियान

0
84

पत्र सूचना कार्यालयाने येत्या २८ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान पैंगीण-काणकोण येथे लोक माहिती अभियानचे आयोजन केले असल्याची माहिती संचालक गुरुनाथ पै यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी जनतेला माहिती देण्यासाठी या लोक माहिती अभियानचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन, आकाशवाणी आदींच्या समन्वयाने या अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. हे लोक माहिती अभियान यशस्वी व्हावे यासाठी चर्चासत्रे, शिबिरे, लघुपटांचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात येणार असून ते भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांवर आधारित असतील. ज्या योजनांविषयी जनतेला माहिती देण्यात येणार आहे त्यात ‘आओ और भारत मे निर्माण करो’, बेटी बचाव बेटी पढाव योजना, शहरों के आधुनिकता की पहले समृद्ध सिटी,’ ग्रामीण गरीबी उन्मूलन के लिए राष्ट्रीय आजिविका मिशन’ आदी योजनांचा समावेश आहे.
या निमित्त एक खास प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. तसेच लोकनृत्य, लोकगीते, खाद्यपदार्थ तयार करण्याच्या स्पर्धा यांचे आयोजन ३० रोजी दुपारी १ वा. घेण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. काणकोण तालुक्यातील दुर्बल घटकामधील लोकांना या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी पैंगीण गावातून परशुराम सभागृहापर्यंत सुमारे ३०० लोकांची एक मिरवणूकही काढण्यात येणार असल्याचे पै यांनी यावेळी सांगितले. २८ रोजी सकाळी ८.३० ते ९ या दरम्यान ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.