>> माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, श्रद्धा माशेलकर पराभूत
पेडणे नगरपालिका निवडणुकीत भाजपा समर्थित गटाचे सहा उमेदवार विजयी झाले, तर ४ अपक्ष उमेदवारांनी विजय खेचून आणला. दिग्गज माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू व श्रद्धा माशेलकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, दोघा अपक्षांनी भाजप समर्थित गटाला पाठिंबा दर्शवल्याने पेडणे नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल.
भाजपा समर्थित उमेदवार राखी कशाळकर, उषा नागवेकर, तृप्ती सावळ देसाई, माधव सिनाई देसाई, विष्णू साळगावकर व सिद्धेश पेडणेकर हे विजयी झाले, तर अपक्ष मनोज हरमलकर, आश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर व शिवराम तुकोजी यांनी बाजी मारली.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी निवडणूक निकालानंतर पेडण्यात भाजपाचाच विजय झाल्याचा दावा केला.
शिवराम तुकोजी ठरले जायंट किलर
पेडणे पालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये दोन दिग्गज माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू व श्रद्धा माशेलकर यांच्यात लढत झाली, मात्र अपक्ष उमेदवार शिवराम तुकोजी यांनी या दोघांना पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ याचा अशा प्रकारे प्रत्यय आला. या प्रभागात देशप्रभू यांना ११५, तर श्रद्धा माशेलकर यांना ९७ मते मिळाली. अपक्ष उमेदवार शिवराम तुकोजी मात्र १८२ मते घेऊन दोन्ही माजी नगराध्यक्षांना धूळ चारत विजयी ठरले.