पेडणे महाविद्यालयाला संत सोहिरोबानाथ आंबियेंचे नाव

0
125
विर्नोडा येथील सरकारी महाविद्यालयाचे संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय असे नामकरण केल्यानंतर कला संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

मान्यवरांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा संपन्न
विर्नोडा, पेडणे येथील सरकारी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे संत सोहिरोबानाथ आंबिये कला व वाणिज्य सरकारी महाविद्यालय असे नामकरण काल खास सोहळ्यात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर, कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, कला संस्कृती खात्याचे प्रसाद परब, कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, शिक्षण संचालनालयाचे संचालक भास्कर नाईक, रामनाथ आंबिये, विर्नोडा सरपंच ऍड्. सीताराम परब, उपसरपंच श्रीमती राव आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले. प्रा. अनिल सामंत यांनी संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्याविषयी बोलताना ते एक चालते बोलते विश्‍वविद्यालय होते असे गौरवोद्गार काढले. दारिद्य्राचे निखारे हातात घेऊन समाजकल्याणासाठी जीवन अर्पित केल्याचे सांगून ‘हरिभजनाविण काळ घालवू नको रे, अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ हा अभंग प्रत्येक विद्यार्थी व विद्यालयांत पोचला पाहिजे असे ते म्हणाले. सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी संत सोहिरोबानाथ आंबियेंचा अभंग प्रत्येक शासकीय कार्यालयात लावण्याची गरज प्रतिपादली. कला संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी संतांचे ग्रंथ जपून ठेवण्याचे आवाहन केले. आरोग्यमंत्री श्री. पार्सेकर यांनी संत सोहिराबानाथ हे भगवंतांच्या रूपात भूमीवर जन्माला आले होते असे सांगितले. प्रा. नीता तोरणे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संत सोहिरोबानाथ आंबिये यांचे अभंग सादर केले.