पेडणे बसस्थानकाचे उद्या उद्घाटन

0
98

>> ३५ वर्षे रखडलेला प्रकल्प अखेर मंत्री आर्लेकरांच्या प्रयत्नाने मार्गी

 

पेडणे बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. २० रोजी सायंकाळी ४ वाजता संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, गोवा साधन सुविधा महामंडळाचे अध्यक्ष तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर, कदंब महामंडळाचे अध्यक्ष के. एल. कार्लोस आल्मेदा, वाहतूक संचालक सुनील मसुरकर व पेडणे नगराध्यक्षा स्मिता कुडतरकर उपस्थित राहणार आहेत.
या ठिकाणी बसस्थानक उभारण्यासाठी यापूर्वी दोन वेळा पायाभरणी झाली. मात्र ज्यांच्या काळात ही पायाभरणी झाली त्या सरकारने या बसस्थानकाकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. दरम्यान या बसस्थानकाच्या कामाला यापूर्वीच्या पेडणे पालिका मंडळाने खो घातला होता त्यामुळे हे काम रखडले.
या बसस्थानकाचे काम मार्गी लावावे म्हणून पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी अहोरात्र प्रयत्न केले व ३५ वर्षांपासून येथील नागरिक करत असलेली बसस्थानकाची मागणी पूर्ण करण्यास यश मिळाले आहे.
याबाबत पंचायमंत्री आर्लेकर यांनी सांगितले की, २०१२च्या निवडणुकीत पेडणेवासीयांना वचन दिले होते त्यानुसार बसस्थानकाचे काम पूर्ण होत असल्याने समाधान वाटत आहे. एकूण २३ कोटी रुपये खर्चून हे सुसज्ज असे बसस्थानक उभारलेले आहे. एकूण १२ प्रवासी बसेस, ४० चारचाकी वाहने व २०० दुचाकी वाहनांची पार्किंग सोय या बसस्थानकावर केल्याचे श्री. आर्लेकर यांनी पुढे सांगितले.
दर दिवशी टॅक्सी स्थानकाजवळ शहरातून बाहेर येणार्‍या जाणार्‍या वाहनाची या टॅक्सी स्टँडवर कोंडी होते. या नवीन बसस्थानकामुळे वाहतुकीची कोंडी आपोआप सुटणार आहे. पेडणे नगराध्यक्षा स्मिता कुडतरकर यांच्याशी संपर्क साधला असता, पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी प्रयत्न करून पेडणे पालिका क्षेत्रात सुसज्ज बसस्थानक पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त करून पेडणे शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला अशी प्रतिक्रिया दिली.
उपनगराध्यक्ष उपेंद्र देशप्रभू यांनी भाजप सरकारने आतापर्यंत जीजी आश्‍वासने दिली होती, ती पूर्ण करण्यास यश आले. शिवाय पेडणेवासीयांची गोवा मुक्तीनंतर बसस्थानकाची मागणी होती, ती मागणी पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त केले. पेडणेचे माजी सरपंच झीला ऊर्फ नारायण मयेकर यांनी बसस्थानकाचे काम मार्गी लावल्याने पंचायत मंत्र्यांचे अभिनंदन करून आता सरकारने दर आठवड्याचा बाजार हा भर रस्त्यावर भरतो तो स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.