पेट्रोल पंप मालकांचा आंदोलनाचा निर्णय ६ मेच्या बैठकीनंतरच

0
115

ऑईल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलवर जास्त कमिशन द्यावे या मागणीसाठी देशभरातील पेट्रोल पंपमालकांनी आंदोलनाचे हत्यार उगारण्याचा निर्णय घेतलेला असला तरी गोव्यातील पेट्रोल पंपचालक आठवडाभरानंतर होणार असलेल्या आपल्या बैठकीत त्याबाबत योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे गोवा पेट्रोल पंपमालक संघटनेचे पदाधिकारी परेश जोशी यांनी काल या प्रतिनिधीला सांगितले.
अखिल भारतीय पेट्रोल पंपमालक संघटनेची बैठक ६ मे रोजी गाझियाबाद येथे होणार आहे. या बैठकीत संघटना काय निर्णय घेते ते महत्वाचे असून त्यापूर्वी कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असे आम्ही ठरवले आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, वेगवेगळ्या राज्यांतील संघटनांनी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. काही संघटनांनी येत्या १० मे रोजी पेट्रोल-डिझेलची खरेदी करायची नाही अशा सूचना आपल्या सदस्यांना दिल्या आहेत, असे जोशी यांनी सांगितले. पेट्रोल पंपचालकांच्या वाढीव खर्चाचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्यात यावा अशी सूचना केंद्राने ऑईल कंपन्यांना नोव्हेंबर महिन्यात केली होती. ती केल्यानंतर आवश्यक तेवढे कमिशन वाढवून द्यावे अशी त्यांना सूचना करण्यात आली होती. पण ऑईल कंपन्यांनी त्याची पूर्तता केली नसल्याने पेट्रोल पंपमालकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जोशी यांनी सांगितले.