राज्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ६० रु. ठेवता यावेत यासाठी राज्य सरकारने काल पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात ६ टक्क्यांनी कपात केली. पेट्रोलवर राज्यात यापूर्वी १५ टक्के मूल्यवर्धित कर होता. तो आता नऊ टक्क्यांवर आणला गेला आहे.
नुकतीच तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने गोव्यात पेट्रोल दर ६२ रुपये ९० पैसे प्रति लीटरवर पोहोचले होते. हे दर साठ रुपयांवर जाऊ देणार नसल्याचे आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी मूल्यवर्धित करात मागच्या वेळी वाढ करताना दिले होते. आता मूल्यवर्धित कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल दर प्रति लीटर ५९ रुपये ६० पैसे झाला आहे. राज्यात विधानसभा नजीक असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या जाहिरनाम्यात दिलेल्या वचनानुसार पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर हटवून नाममात्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेव्हा पेट्रोलचे दर गोव्यात देशाच्या इतर भागापेक्षा ११ रुपयांनी कमी झाले होते व गोवा हे देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल दर असलेले राज्य ठरले होते. विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काही काळापूर्वी पेट्रोलवरील मूल्यवर्धित करामध्ये ७ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.