पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास कंपन्यांना केंद्र परवानगी देणार : ऍड. सावईकर

0
52

देशभरातील तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करीत आहे. त्यासाठी विविध राज्यांत इथेनॉलची निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यास केंद्र राज्यांना आर्थिक मदतही देणार असल्याचे भाजपचे दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

पेट्रोलमध्ये २० टक्के एवढे इथेनॉल मिसळल्यास पेट्रोलवर चालणार्‍या वाहनांद्वारे होणारे वायूप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच देशाला या घडीला जेवढे पेट्रोल आयात करावे लागते तेवढे पुढच्या काळात करावे लागणार नाही. त्यामुळे पेट्रोल आयातीसाठी करावा लागणार खर्चही कमी होणार आहे, असे सावईकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

साखर कारखान्यात इथेनॉल उत्पादन करणे शक्य असून महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉलचे उत्पादन करण्याचा केंद्र सरकारच्या प्रस्तावाला होकार दिला आहे. त्यासाठी ह्या साखर कारखान्यांना कर्ज घ्यावे लागणार असले तरी या कर्जावरील व्याजावर केंद्र सरकार ह्या साखर कारखान्यांना सबसिडी देणार आहे.

संजीवनीत इथेनॉलचे उत्पादन करणार
गोव्यातील बंद असलेला साखर कारखाना सुरू झाला की तेथेही इथेनॉल सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे ह्या बंद पडलेल्या साखर कारखान्याचा अभ्यास करून तो पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे हे सरकारला सूचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष असलेल्या नरेंद्र सावईकर यांनी स्पष्ट केले.