पॅट्रियोटस् स्पर्धेबाहेर; त्रिनबागोचा आठवा विजय

0
293

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील २३व्या सामन्यात त्रिनबागोने सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌चा ५९ धावांनी पराभव केला. त्रिनबागोचा हा सलग आठवा विजय तर पॅट्रियोटस्‌चा सातवा पराभव ठरला. या पराभवासह पॅट्रियोटस्‌चा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्रिनबागोने विजयासाठी ठेवलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रियोटस्ला ७ बाद ११५ धावांपर्यंतच मजल मारता आली.

त्रिनबागोने या सामन्यात अमिर जांगू याला टी-ट्वेंटी पदार्पणाची संधी दिली. पण, या संधीचा लाभ त्याला उठवता आला नाही. सलामीला आलेला जांगू केवळ ६ धावा करून धावबाद झाला. तिसर्‍या स्थानावर उतरलेल्या कॉलिन मन्रो याचा डाव अकाली संपला. अल्झारी जोसेफ याचा चेंडू ग्लोव्हजवर आदळल्यामुळे मन्रो याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. डॅरेन ब्राव्हो (३६ चेंडूंत ३६) व सलामीवीर लेंडल सिमन्स यांनी दुसर्‍या गड्यासाठी १३० धावांची भागीदारी रचली.

सिमन्सने केवळ ६३ चेंडूंचा सामना करताना ९६ धावा चोपल्या. ७ चौकार व ६ षटकारांनी त्यांने आपली खेळी सजवली. डावातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत ड्वेन ब्राव्होने त्रिनबागोला १७४ धावांपर्यंत नेले. पॅट्रियोटस्‌कडून डावखुरा जलदगती गोलंदाज डॉमनिक ड्रेक्स याने ३५ धावांत २ गडी बाद केले. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रियोटस्‌ने स्फोटक सलामीवीर इविन लुईस (५) याला लवकर गमावले. यानंतर त्यांच्या इतर फलंदाजांनी विजयासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. ख्रिस लिन व जोशुआ दा सिल्वा यांनी दुसर्‍या गड्यासाठी ५७ धावा जोडल्या. भारतीय लेगस्पिनर प्रवीण तांबे याने स्वतःच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत ही जोडी फोडली. सिल्वा याने २९ धावांसाठी २७ चेंडू खेळले. तिसर्‍या गड्याच्या रुपात परतलेल्या लिन याने आपल्या ३४ धावांसाठी ४६ चेंडूंचा सामना केला. बेन डंक (९), दिनेश रामदिन (४), डॉमनिक ड्रेक्स (७) यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्रिनबागोकडून सिकंदर रझा याने ३ षटकांत १५ धावा मोजून सर्वाधिक ३ गडी बाद केले. भारताच्या प्रवीण तांबे याने ४ षटकांत १ निर्धाव षटकासह १२ धावांत १ गडी बाद करत भेद मारा केला.

गयानाचा झूक्सला धक्का
सीपीएलच्या २४व्या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने सेंट लुसिया झूक्सचा ७ गडी राखून पराभव केला. झूक्सने विजयासाठी ठेवलेले ११० धावांचे माफक लक्ष्य १३.५ षटकांत गाठले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर झूक्सकडून आठव्या स्थानावरील फलंदाज जावेल ग्लेन याने सर्वाधिक नाबाद २३ धावा केल्या. किमो पॉल व नवीन उल हक यांनी गयानाकडून प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिमरॉन हेटमायरच्या ३६ चेंडूंतील नाबाद ५६ धावांच्या बळावर गयानाने सहज विजय साध्य केला. झूक्सकडून नबी, कुगलाईन व ग्लेन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.