>> २१व्या शतकाच्या अखेरपर्यंत तापमान २ अंश सेल्सियसने वाढणार; जागतिक हवामान बदलविषयक अहवालातून भीती व्यक्त
जागतिक तापमान वाढीबाबत इंटरगर्व्हमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)ने काल जाहीर केलेल्या अहवालातून धोक्याची सूचना दिली आहे. हरित वायूंचे उत्सर्जन कमी न केल्यास २१०० सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात २ अंश सेल्सियसने वाढ होईल, म्हणजेच पुढच्या ७९ वर्षांत हा बदल होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर राहणे कठीण होईल, अशी भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ पृथ्वीच्या प्रत्येक प्रदेशातील वातावरणातील बदल अभ्यासत आहेत. आयपीसीसीमध्ये अहवाल तयार करण्यासाठी ६० देशांतील २३४ वैज्ञानिकांचा समावेश होता. हवामानातील अनेक बदल धक्कादायक असून अशा प्रकारचे बदल यापूर्वी पाहिले गेले नव्हते. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याच बदलामुळे होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता या शतकाच्या अखेरीस समुद्राची पातळी सुमारे दोन मीटरने वाढेल, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. हवामान बदलांमुळे जाणवणारे परिणाम अनेक वर्षांपर्यंत संपुष्टात येऊ शकत नाही, असा इशाराही आयपीसीसीच्या अहवालातून देण्यात आला आहे.
आयपीसीसीने आपल्या सहाव्या अहवालाचा पहिला भाग जाहीर केला आहे. हा अहवाल येत्या काही महिन्यांमध्ये प्रकाशित होणार्या अहवालांच्या मालिकेतील पहिला अहवाल आहे. ग्लासगो येथे होणार्या हवामान परिषदेत (सीओपी२६) या अहवालाचे मोठे महत्त्व आहे. सन २०१३ नंतर हा पहिलाच अहवाल आहे, ज्यामध्ये हवामान बदलाशी संबंधित विज्ञानाचे व्यापक विश्लेषण करण्यात आले आहे.
तापमान स्थिर होण्यास २० ते ३० वर्षांचा कालावधी
आयपीसीसीच्या अहवालानुसार, कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरित वायू उत्सर्जनात सातत्यपूर्ण प्रयत्नाने कपात केल्यास हवामान बदलाचे परिणाम मर्यादित राहू शकतील. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. मात्र जागतिक तापमान स्थिर होण्यास किमान २० ते ३० वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.
तापमान वाढीचा भारतालाही धोका
पृथ्वीच्या तापमानात २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्यास भारताच्या मैदानी प्रदेशातील उष्णता प्राणघातक ठरू शकते. आगामी १० वर्षांत उष्माघाताचा सामना करण्यासाठी भारताने सज्ज राहायला हवे, असा इशारा हा अहवाल जारी झाल्यानंतर तज्ज्ञांनी दिला आहे. मागील काही वर्षांपासून हवामान बदलाचे भारतावरही परिणाम दिसू लागले आहेत. चक्रीवादळ, महापूर, मुसळधार पाऊस आदी संकटे भारतावर आली आहेत.