पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

0
92

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट शक्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी महाराष्ट्र सरकारला असलेला आपला पाठिेंबा काढून घेतल्यानंतर काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिणामी महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. तशी मागणीही भारतीय जनता पक्षाने केली आहे.
गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसबरोबरील आपली युती संपल्याची घोषणा केली होती व युती सरकारचा पाठिंबाही काढून घेतला होता. परिणामी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले होते.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भूमिकेनंतर राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच युती सरकार गडगडले असून तेथे आता अल्प काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू होणे अटळ आहे. तथापि राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी थोडाच कालावधी राहिला असल्याने चव्हाण यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमले जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. मात्र विधानसभेत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले जाण्याआधीच चव्हाण यांनी पदत्याग केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या डावपेचांमुळे कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.