पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्यासाठी शिवसेना कटिबद्ध

0
122

>> युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ग्वाही

>> कोकणातील पूरग्रस्तांशी साधला संवाद

कोकणासह राज्यावर यंदा पूरस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी जनतेकरीता पक्ष व सरकार म्हणून शिवसेनेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातीलच. मात्र, त्याही पलीकडे या आपत्तीमध्ये पक्ष, जात, धर्म, मतदारसंघ याच्या पलीकडे जाऊन संघटितपणे या आपत्तीला सामोरे जाण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बांदा येथील पूरग्रस्तांना संबोधित करताना केले.

आदित्य ठाकरे यांनी काल सोमवारी सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग या कोकणातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. बांदा व्यापारी भुवन येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात पूरग्रस्तांशी संवाद साधला व त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार सचिन अहिर, जान्हवी सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी ठाकरे म्हणाले की, राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पुरामुळे संकट आले आहे. त्यामुळे मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी शिवसेना घेईल. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुरबाधितांच्या पाठीशी शिवसैनिक आणि शिवसेना ठामपणे उभी राहील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांना विम्याची रक्कम नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मिळण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठांशी मुंबईत बैठक घेण्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली. येथील समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना समस्या मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापार्‍यांनी ठाकरे यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या.
बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी बांध्यातील पुरबाधित ग्रामस्थ तथा व्यापारी यांच्या समस्यांची तीव्रता कथन केली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुरसंकटावर तात्काळ करण्यात आलेल्या व यापुढे होणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. खासदार विनायक राऊत यांनीही विचार मांडले. यावेळी ठाकरे यांनी बांदा बाजारपेठेतील व्यापार्‍यांची विचारपूस केली. तत्पूर्वी, त्यांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले.