पूजा शर्माचे नाव आरोपपत्रातून वगळले

0
2

राज्यात गाजलेल्या आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घराची मोडतोड प्रकरणी म्हापसा येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून पूजा शर्मा हिचे नाव वगळण्यात आले आहे.
आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घराचे मोडतोड प्रकरण गतवर्षी जुलै महिन्यात बरेच गाजले होते. या प्रकरणामध्ये पूजा शर्मा हिचा संबंध असल्याने तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणाची ती मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्यानंतर ती गुन्हा अन्वेषण विभागासमोर चौकशीसाठी हजर राहिली होती.

या प्रकरणानंतर पोलीस खात्यातील एक निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. तसेच, राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचीही गोव्यातून बदली करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने आता 13 जणांच्या विरोधात 304 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात पूजा शर्मा हिच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. ठोस पुराव्याच्या अभावामुळे पूजा शर्माचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.