पुराणपुरुषाचे प्रस्थान

0
41

शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी ॥
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि धवल चारित्र्याची गाथा नवनव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी उभे आयुष्य वेचले, तब्बल एका शतकावर आपल्या वाणी आणि लेखणीद्वारे त्या उज्ज्वल शिवचरित्राची मोहिनी घातली असे शिवशाहीर श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे काल अनंताच्या महायात्रेला निघून गेले. शिवरायांना आदर्श मानणारे कोट्यवधी मावळे पुन्हा एकदा पोरके झाले. एक तर इतिहासाच्या जीर्णशीर्ण पानांमध्ये कसर आणि वाळवीचा मुकाबला करीत धूळ खात पडलेली, नाही तर संशोधकांच्या अवघड भाषेतील दुर्मीळ ग्रंथांमध्ये दडलेली शिवचरित्रगाथा शिवशाहिरांनी आपल्या घरंदाज, परंतु ललितरम्य रसाळ शैलीत सर्वांसाठी खुली केली हे त्यांचे भारतवर्षाला दिलेले अत्यंत अमोल योगदान आहे.
नव्या पिढीपुढे आदर्श नाहीत अशी केवळ तक्रार करीत बसणार्‍यांपैकी एक न होता एक महान आदर्श येणार्‍या पिढ्यांपुढे कसा उभा राहील हा ध्यास घेऊन बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. त्यासाठी खस्ता खाल्ल्या, इतिहास धुंडाळला, इतरांच्या संशोधनाची चिकित्सा केली आणि विस्मृतीचा गंज चढलेले शिवचरित्र घासून पुसून मूळ लखलखीत स्वरूपामध्ये परंतु सर्वांना समजेल अशा पद्धतीने समाजापुढे ठेवले. पुन्हा ते केवळ पुस्तकातून सांगणे पुरेसे नाही असे वाटल्याने हजारो व्याख्यानांतून ते समाजाच्या कानीमनी उतरवले. त्यांनी हा सारा खटाटोप करण्यास एक निमित्त घडले होते. बालपणी साक्षात् स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे त्यांचीच नक्कल सादर केल्यानंतर तात्यारावांनी कौतुक तर केले, परंतु ‘आयुष्यात फक्त दुसर्‍यांची नक्कल करीत बसू नकोस’ असेही बजावले. ‘याहुनी करावे विशेष | तरीच म्हणवावे पुरुष’ चा हा साक्षात्कार झालेल्या त्या मुलाने मग आयुष्यात काही विशेष करण्याचा ध्यास घेतला यात नवल ते काय? प्रजेचा पोशिंदा, दुष्टांचा निर्दालक, माताभगिनींचा उद्धारक, रयतेचा कैवारी म्हणून अवघ्या पन्नास वर्षांच्या आपल्या अल्प आयुष्यात ज्या राजाने पुढच्या पिढ्यांसाठी हिमालयाएवढा आदर्श उभा करून ठेवला, त्याची कहाणी नवनव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे हा केवळ एकच ध्यास घेऊन बाबासाहेबांनी आयुष्यभर धावपळ केली. रानवाटा तुडवल्या, कडेकपारी पार केल्या, उन्हातान्हात, पावसावार्‍यात गडकिल्ले चढले उतरले, अस्सल संदर्भ शोधले, बळकट साक्षीपुरावे गोळा केले, त्यावरची संभ्रमाची पुटे दूर केली आणि तो इतिहास नुसता सांगितला नाही, तर तो त्याच्यासवे स्वतःही जणू प्रत्यक्ष जगले. ‘इतिहासाच्या बिकट वाटांचे बाबासाहेबांनी राजमार्ग केले’ असे पुलंनी म्हटले आहे ते उगीच नव्हे. ती एक साधना होती, तपश्चर्या होती. म्हणूनच त्यांच्या शब्दाशब्दाला ते ओज येऊ शकले.
इतिहासकालीन भाले आणि तलवारी काळानुरूप गंजल्या तरी चालतील, परंतु मने गंजता कामा नयेत, यासाठी लेखन, व्याख्यानेच नव्हे, तर ‘जाणता राजा’ पासून ‘शिवसृष्टी’पर्यंतच्या नवनवीन संकल्पांद्वारे शिवचरित्राचे राजदूत बनून वावरलेल्या बाबासाहेबांना छत्रपतींच्या वंशज सुमित्राराजेंनी ‘शिवशाहीर’ म्हणून गौरविले आणि बाबासाहेबांनीही हे बिरुद अभिमानाने मिरविले. ते केवळ शिवचरित्र सांगूनच स्वस्थ बसले नाहीत. गरज भासली तेव्हा त्याच शिवचरित्राच्या प्रेरक कथा सांगत गोवा मुक्तीच्या, दादरा नगरहवेलीच्या लढ्यात स्वतः उतरून चैतन्यही फुंकले.
शिवरायांची गाथाच एवढी जाज्वल्य आणि मनोवेधक की ऐकणार्‍याला तिची गोडी ही लागायचीच. बाबासाहेबांच्या ओजस्वी वाणीतून आणि तेजस्वी लेखणीतून ही गाथा कोट्यवधी लोकांपर्यंत जेव्हा पोहोचली, तेव्हा मने थरारली, अंतःकरणे उचंबळली, रोमरोमांत रोमांच उभे राहिले. स्वराज्य आणि स्वधर्माचा भगवा झेंडा डौलाने फडकवणारा राजा शिवछत्रपती कसा राहायचा, कसा वागायचा, कसा लढायचा हे बाबासाहेबांनी प्रत्ययकारी शब्दांत दाखवले. वर्तमानात जगताना आणि भविष्याचा वेध घेताना इतिहासात मागे जाण्यास अनेकजण कुरकुरतात. परंतु उज्ज्वल भविष्याचा कळस हा देदीप्यमान इतिहासाच्या पायावर उभा असतो हे त्यांना उमगत नाही. इतिहास नेहमीच वर्तमानाला उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देत असतो. शिवचरित्रकथन हे तर असे एक प्रेरणास्थान आहे जे मनामनांत स्वत्व जागवते, स्वाभिमानाची धुनी प्रज्वलित करते. लाखो, कोट्यवधी मनांमध्ये शिवचरित्राच्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म, स्वसंस्कृतीचा स्वाभिमान जागविणारा हा पुराणपुरुष आता आपल्यात नसेल. परंतु त्याने अजरामर केलेली ती प्रेरणादायी शिवचरित्रगाथा पुढची कैक शतके कोण कशी बरे विसरेल? स्वत्व आणि स्वाभिमानाची ती धुनी विझेल कशी?