>> वाजे-शिरोडा येथील घटना; राज्यात चोर्यांचे सत्र सुरूच; पोलिसांसमोर मोठे आव्हान
कुटी-फोंडा येथील फ्लॅट, नावेलीतील बंगला फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पुन्हा फोंड्याकडे वळवला असून, काल चोरट्यांनी वाजे-शिरोडा येथील श्री मंडलेश्वर मंदिराशेजारील वेदा रेसिडेन्सीमध्ये दुसर्या मजल्यावरील रुपेश प्रकाश नाईक यांचा फ्लॅट फोडून सुमारे ३० लाखांचे दागिने लंपास केले. तसेच चोरट्यांनी ५० हजारांची रोकड सुद्धा लांबवली.
राज्यात घरफोडीचे प्रकार वाढले असून, फोंडा तालुका चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. फ्लॅट किंवा घरात कुणीच नसल्याची संधी साधून लाखो रुपयांचे दागिने पळवण्याचे सत्रच सध्या सुरू आहे. फोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुर्टी-फोंडा येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील फ्लॅट फोडल्यानंतर ४८ तासांच्या आत शिरोड्यात मोठी चोरी करून चोरट्यांनी फोंडा पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तसेच आके-बायश, नावेली येथील आशिष शेख यांचा बंगला फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह २० लाखांचा ऐवज लंपास केला होता.
वाजे-शिरोडा येथील श्री मंडलेश्वर मंदिराशेजारील वेदा रेसिडेन्सीमध्ये दुसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रुपेश नाईक यांचा फ्लॅट फोडून सुमारे तीस लाखांच्या दागिन्यांची चोरट्यांनी लूट केली. तसेच कपाटातील पन्नास हजार रोख रक्कमही पळवण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान घडली. भर वस्तीत अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने सध्या लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुपेश नाईक हे उद्योजक असून, त्यांची पत्नी शिरोडा आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करते. काल एका लग्नसमारंभानिमित्त घरातील मंडळी बाहेर पडली होती. नेमकी तीच संधी चोरट्यांनी साधली. चोरीत कपाटात ठेवण्यात आलेली ५० हजारांची रोख रक्कम आणि ३० लाखांचे दागिने चोरट्यांनी पळवले.
सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे तपास सुरू
या इमारतीच्या बाजूलाच राहणार्या वाहतूक खात्याच्या निरीक्षकाच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघेजण दुचाकीवरून या इमारतीकडे आल्याचे दिसले. मात्र, दोघांचेही चेहरे दिसले नसल्याने पोलिसांसमोर तपास करणे कठीण बनले आहे, तरीही पोलिसांनी सीसीटीव्हीची फुटेज मिळवली असून, त्या दिशेने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश
चोरट्यांनी इमारतीच्या गेटचे कुलूप तसेच फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फ्लॅटमधील कपाट फोडून त्यांनी आतील दागिने व रोख रक्कम पळवली. सुगावा लागू नये म्हणून चोरट्यांनी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा फोडले. या इमारतीतील अन्य एका फ्लॅटमध्ये विद्यार्थी राहतात, तर दुसर्या फ्लॅटमध्ये एक दांपत्य राहते, पण ती दोघे कामानिमित्त सकाळीच बाहेर पडली होती. त्यामुळे पूर्ण इमारतीत कुणीच नसल्याची खात्री करूनच ही चोरी करण्यात आली.