प्रलयंकारी पावसाने पुणे शहरात मंगळवारपासून हाहाकार माजवला असून त्यात १७ जण मरण पावले आहेत. तसेच अनेक जनावरेही दगावली आहेत. दरम्यान जळगावमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील विविध भागांतील एक हजारहून अधिक जनावरे दगावल्याचे वृत्त आहे. काल दुपारपर्यंत ठिकठिकाणच्या अडकलेल्या १६ हजार लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पुणे शहरात मंगळवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी मध्यरात्री रुद्रावतार धारण केला. त्यामुळे सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील निवासी सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.
पाण्याच्या प्रचंड वेगामुळे कात्रज भागात ५० हून अधिक दुचाक्या तसेच चार चाकी वाहनेही वाहून गेली आहेत. या आपत्कालीन प्रसंगी मदत कार्य करताना एनडीआरएफ व अग्नीशामक दल पथकांना सिंहगड व सहकार नगरात दोन मृतदेह सापडले. त्यानंतर मृतांची संख्या वाढली. गुरुवारी दुपारनंतर पाणी ओसरल्याचे सांगण्यात आले. पुणे शहर तसेच जिल्ह्यात विविध भागांत घरांच्या छतांवर, झाडांवर व अन्यत्र अडकलेल्या १६ हजार लोकांची सुटका मदत पथकांनी केली.