पीपीपी सुकाणू समितीची आज पणजीत पहिली बैठक

0
269

>> चार प्रकल्पांवर निर्णय होण्याची शक्यता

राज्य सरकारने स्थापन केलेल्या पीपीपी प्रकल्प सुकाणू समितीच्या आज गुरुवार दि. ८ ऑक्टोबर रोजी होणार्‍या पहिल्या बैठकीत नवीन पणजी बसस्थानक प्रकल्पासह चार पीपीपी तत्त्वावरील प्रकल्पावर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे.

या बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार्‍या अन्य प्रकल्पामध्ये वाशी मुंबई येथील गोवा भवन, सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प आणि कन्वेंशन सेंटर या प्रकल्पाचा समावेश आहे.
राज्य सरकारने पीपीपी सुकाणू समितीची स्थापना जुलै २०२० मध्ये केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पहिली बैठक आज दि. ८ रोजी संध्याकाळी ४ वा. पाटो पणजी येथील पर्यटन भवन इमारतीच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीत संबंधितांकडून प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण केले जाणार आहे. पीपीपी सुकाणू समितीची पहिली बैठक मागील आठवड्यात निश्‍चित करण्यात आली होती.

तथापि, मुख्यमंत्री डॉ. सावंत दिल्ली दौर्‍यावर गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. सर्वसाधारण प्रशासन, वाहतूक, वित्त आदी खात्यांनी वरील पीपीपी प्रकल्पाची कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रकल्पाच्या कार्यवाहीत येणार्‍या अडथळ्यांची माहिती बैठकीत देण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे.