पीएफ रक्कम काढण्यावरील निर्बंध रद्द

0
118

>>केंद्रीय मंत्री दत्तात्रेयांची घोषणा : कामगार संघटनांच्या दबावाचा परिणाम

कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ)तील रक्कम काढण्यावर निर्बंध घालणार्‍या नव्या नियमांबद्दलचा आदेश मागे घेण्यात आल्याचे केंद्रीय मजूर मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी हैद्राबाद येथे काल एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विशेष म्हणजे बंगळुरूत याच विषयावरून सतत दोन दिवस कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे काल संध्याकाळी दत्तात्रेय यांनी वरील प्रस्ताव तीन महिने स्थगित ठेवल्याचे दिल्लीत जाहीर केले होते.

‘पीएफ रक्कम काढण्यासंबंधीचे १० फेब्रुवारी २०१६ची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. आता या संदर्भात जुनीच पध्दत चालू राहील’ असे दत्तात्रेय यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले. कामगार संघटनांनी केलेल्या विनंतीवरून आम्ही आमचा आधीचा निर्णय मागे घेत आहोत असे ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मजूर मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) विषयीच्या नव्या प्रस्तावाला देशभातील कामगार संघटनांनी तीव्र विरोध जाहीर केला असतानाच काल या प्रस्तावाविरोधात बंगळूर शहरात कामगारांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. अनेक खाजगी तसेच सार्वजनिक आस्थापनांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवरच केंद्रीय मजूरमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी वरील प्रस्तावाला तीन महिन्यांची स्थगिती दिली.
यामुळे भविष्य निर्वाह निधीतील १ मेपासून लागू होणार असलेले निर्बंध ३१ जुलैनंतर लागू होणार असून सर्व संबंधितांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे दत्तात्रेय यांनी स्पष्ट केले आहे.
पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तथापि त्या प्रस्तावास प्रचंड विरोध झाल्याने केंद्र सरकारने तो मागे घेतला. मात्र पीएफमधील संपूर्ण रक्कम काढता न येण्याचा प्रस्ताव तसाच ठेवण्यात आला. नियमानुसार कर्मचार्‍याने नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढण्याचा अधिकार होता. परंतु नव्या प्रस्तावानुसार कर्मचार्‍याला केवळ स्वत:च्या पगारातून जमा झालेली रक्कम काढता येणार आहे. आस्थापन मालक किंवा कंपनीकडून कर्मचार्‍याच्या खात्यावर जमा झालेली रक्कम काढता येणार नसल्याचा निर्णय केंद्रीय मजूर मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन काल त्याचे पर्यावसान बंगळुरूत हिंसक आंदोलनात झाले. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही कामगार संघटनेने हाक दिलेली नव्हती.

बंगळुरूत हिंसक आंदोलन
बंगळुरूत पीएफच्या नव्या नियमाविरोधात काल
सकाळी ९.३० पासून उत्स्फूर्त आंदोलनास प्रारंभ केला. गार्मेंट कारखाना कर्मचार्‍यांसह सरकारी कर्मचारीही यात सहभागी झाले. एका पोलिस स्थानकासमोर जप्त करून ठेवलेल्या वाहनांना तसेच काही ठिकाणी बसगाड्यांना आगी लावण्यात आल्या. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.
कर्नाटक-तामिळनाडूला जोडणार्‍या महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे अन्य अनेक प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. दुपारी १ वा. स्थितीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले.