पोलिसाच्या मुलाने पिस्तुलाचा चाप ओढल्यामुळे सुटलेली गोळी त्याच्याच डोळ्यात जाऊन चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी रात्री डिचोली येथे घडली.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली. पणजी मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल दशरथ वायंगणकर हे सध्या देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर होते.
गुरुवारी रात्री १०.३० वाजता आपली ड्युटी संपवून घरी आल्यावर आपले पिस्तुल त्यांनी टेबलवर ठेवले होते. त्यावेळी त्यांचा ४ वर्षांचा मुलगा खेळत तिथे आला व त्याने पिस्तुल हातात घेऊन पिस्तुलाचा चाप ओढला. यावेळी बंदुकीची गोळी त्या मुलाच्या उजव्या डोळ्यात घुसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाला तातडीने इस्पितळात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेची डिचोली पोलिसांना कल्पना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळीला पाठवून शुक्रवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पुढील पोलीस तपास चालू आहे.