पिटबुल श्वानाच्या हल्ल्यात 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

0
9

हणजूण येथील घटना; हिंस्त्र श्वानांवर बंदी कधी?

हणजूण येथे पिटबुल जातीच्या श्वानाने केलेल्या हल्ल्यात एका 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली. प्रभास कळंगुटकर असे या मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, गेल्या वर्षी हिंस्त्र व धोकादायक श्वानांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचे सुतोवाच केले होते; मात्र अद्याप अशा श्वानांवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे बंदी कधी घालणार, असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगा आपल्या आईसोबत तिच्या कामाच्या ठिकाणी गेला होता, तेव्हा पिटबुल जातीच्या श्वानाने त्याच्यावर हल्ला केला. त्यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते; मात्र इस्पितळात उपचार सुरू असताना त्या मुलाचा मृत्यू झाला.
ताळगाव येथे गेल्या वर्षी रॉटवेलर श्वानाने दोन मुलांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच वास्को येथे एका व्हिलाच्या मालकाने पाळलेल्या दहा कुत्र्यांच्या गटाने एका गरोदर महिलेवर हल्ल्याची घटना सुध्दा गतवर्षी घडली होती.

यानंतर राज्य सरकारने धोकादायक श्वान पाळण्यास बंदी घालण्यावर विचार केला जात असल्याचे जाहीर केले होते; मात्र अजूनपर्यंत बंदी घालण्यात आलेली नाही. आता पिटबुल जातीच्या श्वानाने एका निष्पाप मुलाचा जीव घेतल्याने धोकदायक श्वानांवरील बंदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.