- डॉ. मनाली महेश पवार
पावसाळा हा सर्वात जास्त आजार घेऊन येणारा ऋतू. हा काळ जीव-जंतूंसाठी पोषक असतो; आपल्यासाठी नाही. आयुर्वेदशास्त्रानुसार पावसाळ्यात पाणी व वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतुसंसर्ग लगेच होतो व साथीचे आजार लवकर पसरतात. हे टाळण्यासाठी अगोदरच काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या पावसाने जोर धरला आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या-नाले भरून वाहत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. रस्ते पाण्याखाली येत आहेत. झाडे-फांद्या कोसळत आहेत. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात ‘रेड-ॲलर्ट’ दिलं जातं व शाळा-कॉलेजांना सुट्ट्या जाहीर केल्या जातात. अशा काळात खरं तर घरात राहून पावसाचा आनंद लुटणे आवश्यक असते. पण बरेच जण सुट्टी म्हटल्यावर मुलांना घेऊन पिकनिक प्लॅन करतात. हे योग्य आहे का? पावसाळा हा सर्वात जास्त आजार घेऊन येणारा ऋतू. हा काळ जीव-जंतूंसाठी पोषक असतो; आपल्यासाठी नाही.
आयुर्वेदशास्त्रानुसार पावसाळ्यात पाणी व वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतुसंसर्ग लगेच होतो व साथीचे आजार लवकर पसरतात. या विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनिया, कॉलरा, कावीळ इत्यादी. हे सगळे आजार दूषित, अशुद्ध पाण्याच्या संसर्गात आल्याने होतात. म्हणून या काळात स्वतःची व आपल्या प्रियजनांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष दक्षता घेतल्यास पाण्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांपासून दूर राहता येते.
दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे
- जुलाब, उलटी
- दूषित पाण्यामुळे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ- पाण्याप्रमाणे- होण्याचे प्रमाण वाढते.
- त्याचप्रमाणे पोटात ढवळणे, उलट्या होणे, मळमळणे आदी लक्षणे वाढतात.
- जुलाब, उलट्या जास्त प्रमाणात झाल्यास डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा येतो. त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर जाताना बाहेरचं खाणं-पिणं कटाक्षाने टाळा.
- टायफॉइड
- दूषित पाण्याच्या संपर्कामधून याची लागण होण्याची शक्ती अधिक असते. सुरुवातीला हलका ताप येतो, मग ताप वाढतो, 103 ते 104 पर्यंत जातो. पोटात वेदना होतात. भूक कमी होते. डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, काहींच्या छाती व पोटावर चपटी गुलाबी रंगाची पुरळ उठते. टायफॉइड ताप हा साल्मोनेला टायफी बॅक्टेरियामुळे होतो आणि पावसाळ्यात तो मोठ्या प्रमाणात आढळतो. दूषित पाणी आणि अन्न, ज्यामध्ये प्रक्रिया न केलेल्या पाण्याने धुतलेली फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. यामुळे संसर्ग पसरतो. योग्य स्वच्छता, उकळलेले स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणे आणि रस्त्यावरील अन्नपदार्थ टाळणे आवश्यक.
- हिपॅटायटीस ‘अ’
- हा विषाणूजन्य आजार यकृतावर परिणाम करतो व दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरतो. पावसाळ्यात स्वच्छतेच्या अभावामुळे हिपॅटायटीस ‘अ’च्या संसर्गाचा धोका वाढतो. कावीळ, थकवा, पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, स्वच्छ शिजवलेले अन्न खावे आणि कच्चे, रस्त्यावरील अन्न टाळावे.
- डेंग्यू
- डेंग्यू ताप हा डेंग्यू विषाणूमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो संक्रमित एडीस डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. डेंग्यू ताप सौम्य फ्लूसारख्या लक्षणापासून ते गंभीर आजारापर्यंत असू शकतो. उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, डोळ्यांच्या मागे वेदना, सौम्य रक्तस्राव- जसे की नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सहज जखम होणे. यावर साधा उपाय म्हणजे डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेले पाणी काढून टाकणे आवश्यक आहे.
- मलेरिया
- हा प्लाझमोडियम परजीवीमुळे होणारा आजार, जो संक्रमित मादी ॲनोफिलिस डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. पावसाळ्यात याचा धोका वाढतो. ताप येणे, थंडी वाजून येणे, घाम सुटणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा अशी लक्षणे यात आढळतात.
- चिकनगुनिया
हा विषाणूजन्य आजार एडिस डासांमुळे मानवांमध्ये पसरतो. हा आजार अचानक ताप येणे आणि सांधेदुखीने सुरू होतो. यात अचानक उच्च ताप, तीव्र सांधेदुखी, स्नायूदुखी, पुरळ, डोकेदुखी व थकवा अशी लक्षणे आढळतात.
हा धोका कमी करण्यासाठी डासांपासून सावध राहाणे आवश्यक. त्यासाठी साचलेले पाणी काढून टाकावे, डास प्रतिबंधिक स्प्रे अथवा जाळ्या वापराव्या. - लेप्टोस्पायरोसिस
हा लेप्टोस्पायरा बॅक्टेरियामुळे होणारा एक जिवाणूजन्य रोग आहे. सामान्यतः संक्रमित पाण्याच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या किंवा मातीच्या संपर्कातून पसरतो. पुरामुळे बॅक्टेरिया अधिक सहजपणे पसरू शकतात. मानवाला त्यांची लागण होऊन जास्त ताप, डोकेदुखी, थंडी वाजून ताप, स्नायू दुखणे, उलट्या, कावीळ, डोळे लाल होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात व योग्य उपचार न केल्यास गुंतागुंत होऊ शकते. - कॉलरा
हा व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूमुळे होणारा तीव्र अतिसाराचा आजार आहे, जो सामान्यतः दूषित पाणी आणि अन्नाद्वारे पसरतो. पावसाळ्यात पुरामुळे जिवाणूंचा प्रसार वाढू शकतो व हा सार्वजनिकही होऊ शकतो. कॉलरामुळे गंभीर निर्जलीकरण होऊ शकते, आणि त्वरित उपचार न केल्यास मृत्यूदेखील येऊ शकतो. भरपूर पाण्यासारखा अतिसार (म्हणजे तांदळाच्या पाण्यात मल) होतो, उलट्या, तोंड कोरडे पडणे, लघवी कमी होणे, डोळे बुडणे, आळस, जलद हृदय गती, पेटक्यांसारखी लक्षणे दिसू लागतात. - बुरशीजन्य संसर्ग
वाढलेली आर्द्रता आणि ओलसर परिस्थिती बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. हे संक्रमण शरीराच्या विविध भागांवर परिणाम करू शकते, ज्यांत त्वचा, नखे, श्वसनसंस्था यांचा समावेश होतो. खाज सुटणे, लालसरपणा, पुरळ, स्केलिंग, फोड, नखांचे संक्रमण, भेगा, खोकला, ताप, छातीत दुखणे यांसारखी लक्षणे दिसतात.
पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांच्या बचावासाठी पाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या आजारांचा बचावही शुद्ध पाणीच करू शकते. खरं तर उपलब्ध असणाऱ्या विविध जलप्रकारांमध्ये पावसाचे पाणी हे सर्वात अधिक शुद्ध असते. कारण त्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम या द्रव्यांची अशुद्धी न मिसळल्यामुळे ते मृदू असते. तसेच रोगजंतूही मिसळत नाहीत. मात्र हे पाणी जमिनीवरील पाण्याइतके चवदार नसते. तसेच काही वेळा वातावरणातील वायुरूप अशुद्ध द्रवे पावसाच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता असते.
पावसाचे पाणी जीवन, तर्पण, हृद्य, आल्हाददायक, वृद्धीला चालना देणारे, लघु, स्वादू, चविष्ट, शीत, शुद्ध व अमृतासमान असते. त्याच्या शीत, जीवनीय व सौम्य गुणाने ते पित्त, रक्त व विषघ्न आहे. सूर्यकिरणांच्या संपर्कामुळे लघु व वात-कफघ्न आहे.
जमिनीवर पडून ते वाहू लागल्यानंतर भूमी, वायू, चंद्र, सूर्य यांच्या संपर्कानुसार व देशभेदाने या जलाचे गुण बदलतात.
सुरुवातीच्या पावसाच्या पाण्यामध्ये पर्यावरणातील धूळ, धूर, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया इत्यादी वायू या गोष्टी मिसळून दूषित होते. म्हणून पहिल्या-पहिल्या पावसामध्ये दूषित पाण्याने वरील अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे अर्धा तास मोठा पाऊस पडून गेल्यानंतर मोकळ्या ठिकाणी पातळ वस्त्र तोंडावर बांधून भांड्यात पाणी जमा करून प्यायला वापरावे. जलातील गढूळपणा नष्ट करण्यासाठी पाणी विविध प्रक्रियांनी प्रथम गाळले जाते.
- जंतू, कचरा, माती इत्यादी असल्यास जाड कापडावरून पाणी अनेक वेळा गाळून घ्यावे.
- गढूळ पाणी उकळून, उन्हात ठेवून, तप्त लोह गोळा त्यात बुडवून वापरावे.
- मलिन जल असल्यास कमलताल, पद्मकाष्ट, मोती, गोमेद यांतील जे उपलब्ध असेल त्याने स्वच्छ करावे.
- दुर्गंधी येत असल्यास गुलाब, मोगरा, वाळा इत्यादी टाकून सुगंधित करून वापरावे.
- आयुर्वेदशास्त्रामध्ये तांब्याच्या पात्राची प्रशंसा केली आहे. स्वच्छ तांब्याच्या पात्रात 24 तास पाणी ठेवले असता ते पाणी पूर्ण निर्जंतुक बनते.
- तसेच आयुर्वेदशास्त्रात जलजन्य व्याधी टाळण्यासाठी पाणी हे काढ्याप्रमाणे उकळून प्यावे असे सांगितले आहे. पाणी फक्त गरम करून नव्हे तर चांगले उकळून-आटवून प्यावे व अशा प्रकारचेच पाणी स्वयंपाकात वापरावे.
या गोष्टी बाहेर खाल्ल्यास हे शक्य आहे का? एवढी काळजी बाहेर कोण घेतं का? म्हणून घरचे ताजे अन्न खावे. - अन्नाबाबत स्वच्छता पाळावी. खाण्यापूर्वी फळे, भाज्या काळजीपूर्वक धुवून घ्याव्यात. ताजे शिजवलेले अन्न, खीर, दही, ताक आपल्या आहारात घेण्याचा प्रयत्न करावा.
- हातांची विशेष स्वच्छता राखावी.
- डास नियंत्रणाची खबरदारी घ्यावी.
- घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. धूपन करावे.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियमित व्यायाम करावा. घरांमध्येच योग, स्ट्रेचिंग, नृत्यासारखे व्यायामप्रकार करावेत, म्हणजे दरवर्षी ज्या जलजन्य आजारांचा सामना करावा लागतो, त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो.