पावसाळ्यात खनिज वाहतुकीस धारबांदोडावासियांचा तीव्र विरोध

0
96

>> उपजिल्हाधिकारी, कंपनी अधिकारी, पंचायत मंडळ यांची बैठक

 

धारबांदोडा उपजिल्हाधिकारी आग्नेल ङ्गर्नांडिस यांनी काल सकाळी वेदांता खाण कंपनीचे अधिकारी व धारबांदोडा ग्रामपंचायत मंडळाशी खनिज वाहतुकीसंदर्भात चर्चा केली. मात्र कोणत्याही स्थितीत पावसाळ्यात खनिज वाहतूक करू न देण्याचा निर्धार धारबांदोडा पंचायतीचे सरपंच बालाजी गावस यांनी व्यक्त केला असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. उपजिल्हाधिकारी या संबंधीचा निर्णय उद्या बुधवारी देणार आहेत.
गेल्या रविवारी धारबांदोडा पंचायतीच्या ग्रासभेतही पावसाळ्यात खनिज वाहतूक बंदीचा ठराव घेण्यात आला होता. मात्र खाण कंपनीचे अधिकारी जबरदस्तीने वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करीत आहेत. काल उपजिल्हाधिकारी आग्नेल ङ्गर्नांडिस यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सरपंच बालाजी गावस, पंच कालिदास मायणेकर, मामलेदार सतीश प्रभू, वेदांता कंपनीचे अधिकारी जोजेङ्ग कोएलो व सिताराम वालावलकर उपस्थित होते.
आमोणा येथील पीग आयर्न प्रकल्पाला दरदिवशी ४०० ट्रिप्स खनिज मालाची आवश्यकता असून प्रकरण बंद पडल्यास ४ हजार कामगार बेकार पडणार असल्याचे जोजेङ्ग कोएलो यांनी उपजिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र सरपंच बालाजी गावस यांनी पावसाळ्यात खनिज वाहतूक सुरू करण्यास धारबांदोडावासियांचा विरोध असून विरोध डावलून जबरदस्तीने वाहतूक सुरू केल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. उपजिल्हाधिकारी आग्नेल ङ्गर्नांडिस यांनी पावसाळ्यात खनिज पावडरची वाहतूक करू देणार नाही. मात्र खडी वाहतुकीसंदर्भात विचार विनिमय केला जाईल असे सांगितले. तसेच येत्या बुधवारी दुपारी ३ वाजता आपला निर्णय कळविणार असल्याचे उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.