पावसाळी अधिवेशन केवळ तीन दिवस

0
124

>> राज्यपालांकडून आदेश जारी; २८ जुलैपासून होणार अधिवेशनाला प्रारंभ

गोवा विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन केवळ तीन दिवस घेतले जाणार आहे. येत्या २८ जुलै २०२१ पासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनाबाबत काल राज्यपालांनी आदेश जारी केला. २८ ते ३० जुलै २०२१ असे तीन दिवस अधिवेशन घेतले जाणार आहे.

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज मार्च महिन्यात अर्ध्यावरच थांबवण्यात आले होते. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. सत्ताधारी गटाकडून या तीन दिवसांच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.

२८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. अधिवेशनाच्या प्रश्‍नांची तीन गटात विभागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, मत्स्योद्योग मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांच्या खात्याशी संबंधित प्रश्‍न येत्या ५ जुलैला दुपारी १ वाजेपर्यंत आमदारांना सादर करता येणार आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे २८ जुलै रोजी दिली जाणार आहेत.

६ जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत मुख्यमंत्री डॉ. सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या खात्याशी निगडित प्रश्‍न सादर करता येतील. या प्रश्‍नांची उत्तरे २९ जुलै रोजी दिली जाणार आहेत.

७ जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, वीजमंत्री नीलेश काब्राल आणि नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या खात्याशी निगडित प्रश्‍न विचारता येतील. या प्रश्‍नांची उत्तरे ३० जुलै रोजी दिली जाणार आहेत.