पावसाळी अधिवेशनात नवे सौरऊर्जा धोरण जाहीर

0
16

>> वीजमंत्र्यांची माहिती; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात नवीन सौरऊर्जा धोरण जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पर्वरी येथील सचिवालय इमारतीवर बसवलेल्या ४० मॅगावेट सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वीज मंत्री ढवळीकर, वीज खात्याचे सचिव राजशेखर आदींची उपस्थिती होती.
राज्यात सौरऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. राज्यातील पाच सरकारी महाविद्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. राज्यात आत्तापर्यंत १३ सौरऊर्जा प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
पणजी स्मार्ट सिटीमध्ये अंदाजे ९ कोटी रुपये खर्चून १.६ मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आदेश येत्या १५ दिवसांत जारी केला जाणार आहे. राज्यात २०० शेती, बागायतीतील विद्युत पंपासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची योजना आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले. राज्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून ७० ते ८० मॅगावेट वीज तयार होत आहे. वर्षभरात २०० मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

उद्योगांना वीजटंचाई भासणार नाही
राज्यातील उद्योगांना वीज कमी पडू दिली दिली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तमनार प्रकल्पाची कार्यवाही केली जाणार आहे. या तमनार वीज प्रकल्पातून राज्याला १२० मेगावॉट वीज मिळणार आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.