पालिका निवडणुकीसाठी ६६.७० टक्के मतदान

0
133

>> कोरोनाबाधित १७७ जणांनी बजावला हक्क

राज्यातील मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच नगरपालिका मंडळाच्या काल घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी ६६.७० टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान सांगे येथे ८१.४९ टक्के आणि सर्वांत कमी मतदान मडगाव येथे ६४.२५ टक्के एवढे झाले. निवडणूक मतदानाच्या काळात मोठ्या अनुचित प्रकाराची नोंद नाही. एकूणच मतदान शांततेत पार पडले असून ४०२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतमोजणी सोमवार २६ एप्रिल रोजी केली जाणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर पाचही नगरपालिका क्षेत्रात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे १ लाख २३ हजार ५४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष ६१ हजार ९८५ आणि महिला ६१ हजार ५६१ मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत कोरोनाबाधित असलेल्या एकूण १७७ रुग्णांनी मतदान केले. म्हापसा येथे ४३, मडगाव येथे ५२, मुरगाव येथे ५७, सांगे येथे २१ आणि केेपे येथे ४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
दोन ग्रामपंचायतींच्या प्रभाग पोटनिवडणुकीसाठी ७८.३८ टक्के मतदान झाले. कारापूर सर्वण पंचायतीच्या प्रभाग २ मध्ये ८५.९६ टक्के आणि वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग ४ मध्ये ६५.५९ टक्के मतदान झाले.

भाजपचा पराभव निश्‍चित ः कामत

शुक्रवारी गोव्यात झालेल्या पाच नगरपालिका निवडणुकांत भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव अटळ असल्याची प्रतिक्रिया काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली.

कोविड महामारीचे संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या असंवेदनशील व बेजबाबदार भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशात लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भाजप सरकारला कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय प्राणवायू पुुरविण्यात पूर्ण अपयश आलेले असून त्यामुळे गोव्यात शेकडो कोविड रुग्णांचे प्राण गेल्याचे कामत यांनी नमूद केले.

पराभव समोर दिसत असल्याने वैफल्यग्रस्त बनलेल्या भाजप सरकारने पोलीस बळाचा व सरकारी यंत्रणेचा वापर करणे सुरू केले असून कॉंग्रेस समर्थकांवर दबाव टाकण्याचे सत्र आरंभल्याचा आरोप कामत यांनी केला.

भाजप सरकारने सर्व मर्यादा तोडून खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे व हे धक्कादायक असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यात, विकास करण्यात व लोकशाहीचे रक्षण करण्यात भाजप सरकार संपूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे शुक्रवारी मतदान झालेल्या पाच नगरपालिका निवडणुकांत भाजपचा पराभव हा अटळ असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.