पार्क केलेल्या ट्रकला धडकून वास्कोत स्कूटरवरील दोघे ठार

0
128

शांतीनगर-वास्को येथील राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे ५ वा. एका दुचाकीने पार्क केलेल्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर-वास्को येथील चौपदरी महामार्गावर एका बाजूला पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या (क्र. जीए ०२ व्ही ७०५२) काल पहाटे विमानतळाकडून मांगूरहिलच्या दिशेने जाणार्‍या दुचाकीने (क्र. जीए ०६ क्यू ०८६७) पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक व त्याच्या पाठीमागे बसलेला जागीच ठार झाले. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्यांची नावे श्याम तिंकुड साबार (२१) व दाऊद अदा साबार (२३) अशी असून ते दोघेही ओडिसा येथील असल्याचे सांगण्यात आले. सध्या दाबोळी येथील एका घरात भाडेकरू म्हणून राहत होते. वास्को पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी बांबोळी गोमेकॉत पाठविले आहे. नंतर ते त्यांच्या कुटंबियांच्या ताब्यात देण्यात आले. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराम गावस, निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
रस्त्याकडेला पार्क केलेली
वाहने त्रासदायक
दरम्यान, एअरपोर्ट ते वरुणापुरी जंक्शन पर्यंतच्या या राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा अवजड वाहने तसेच इतर चाकीचाकी वाहने पार्क करून ठेवत असल्याने या महामार्गावरून जाणार्‍या शेकडो वाहनांना तसेच पादचार्‍यांनाही त्रास होत आहे. महामार्गाच्याकडेला वाहने पार्किंग करण्यास सक्त विरोध असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. यापूर्वी येथील नागरिकांच्या तसेच या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहन चालकांच्या अनेक तक्रारींना अनुसरून वास्कोचे तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी या महामार्गावर वाहने पार्क करणार्‍यावर दंडात्मक कारवाई करून या वाहन पार्किंगविषयी सुसुत्रता आणली होती. तेव्हापासून येथे पार्किंगवर नियंत्रण होते. पण निरीक्षक श्री. नार्वेकर यांची बदली होताच येथील महामार्गावर पुन्हा एकदा पार्किंगचा बोजवारा सुरू झाला. याचा या महामार्गावरील वाहूतक रहदारीला किती त्रास होतो हे कालच्या अपघातावरून दिसून आले आहे.