॥ संस्कार रामायण ॥
- प्रा. रमेश सप्रे
पुत्रजन्मानंतर अयोध्यावासीयांना आकाशाएवढा आनंद होतो. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ हे त्या काळात जणू अयोध्यागीत बनले होते. हा साऱ्या अयोध्येचा भाग्यपर्वकाल होता. या साऱ्या घटनाप्रवाहात अनेक संस्कार दडले आहेत…
आपण सणासुदीला ‘पायस’ (भाताची खीर) करतो; पण ‘पायसदान’ म्हणत नाही अन् करतही नाही. ‘पसायदान’ या शब्दाची मात्र आपल्या कानाला सवय झालेली आहे. या दोन दानात महत्त्वाचा फरक आहे. ‘पसायदान’ हे मागणे (प्रार्थना) असते, तर ‘पायसदान’ हे देणे असते. प्रपंचातून सुटण्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागायचे असते, त्या परमेश्वराकडे! अनेक साधुसंतांनी असे पसायदान म्हणजे प्रसाददान भगवंताकडे मागितलेय. सर्वात प्रसिद्ध, कदाचित सर्वात आद्य पसायदान ज्ञानोबामाऊलीनेच मागितलेय त्या ‘विश्वात्मक देवाकडे’ किंवा आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांकडे. म्हणूनच शेवटी म्हटले जाते-
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो। सुखिया झाला॥
पायसदान म्हटले की आपल्याला आठवतो तो प्रसंग जो गीतरामायणामुळे सर्वांच्या मनात ठसला. साक्षात यज्ञपुरुष अग्निदेव यज्ञकुंडातून प्रकट होऊन दशरथाला म्हणतो-
तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो, हा माझा सन्मान।
दशरथा, घे हे पायसदान… पायसदान॥
- असा कोणता यज्ञ केला होता दशरथ राजाने? त्याला कोणती पार्श्वभूमी होती? एक पार्श्वभूमी म्हणजे श्रावणकुमाराच्या अंध माता-पित्यांनी राजा दशरथाला दिलेला शाप. यामुळे एकप्रकारे आपल्याला संतान होण्याच्या आशा दशरथाच्या मनात पल्लवित झाल्या होत्या. दुसरी पार्श्वभूमी खास कौटुंबिक नि वैयक्तिक होती.
अपत्यप्राप्तीसाठी तीनशेहून अधिक विवाह करूनही दशरथ निपुत्रिकच होता. त्यामुळे राजवाड्यातलेच नव्हे तर साऱ्या अयोध्येतील वातावरण काहीसे मलूल, उदास झाले होते. हा भाव अप्रतिम रीतीने गीतरामायणात व्यक्त झालाय.
महाराणी कौसल्या स्वतःच्या दैवाला दोष देत स्वतःशीच बोलते-
उगा का काळिज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले। - अशाच प्रकारची आजूबाजूची इतर दृश्ये पाहूनही ती उदास होते. उदा. हरिणी-पाडस, गाय-वासरू, पक्षिणी नि पिल्लं, इतकेच नव्हे तर ती म्हणते-
मूर्त जन्मते पाषाणातुन।
कौसल्या का हीन शिळेहुन?
यापुढे तर आकाशाकडे पाहून विचारते-
गगन आम्हांहुन वृद्ध नाही का? - त्यात जन्मती किती तारका?
…अकारण जीवन हे वाटले।
सर्व राण्यांच्या वतीने हा प्रश्न विचारणारी कौसल्या स्वतः सदैव उदास राहत होती. आपल्या प्रिय कौसल्येची उदास मनःस्थिती पाहून दशरथ नेहमी अस्वस्थ होई. तो वरचेवर कौसल्येला म्हणे-
उदास का तू?
आवर वेडे नयनातील पाणी,
लाडके कौसल्येराणी।
श्रावणहत्या प्रसंगानंतर त्याच्या मनात आशेचा अंकुर फुटला. वसिष्ठ, सुमंत्र यांच्या सल्ल्यानुसार दशरथाने अश्वमेध यज्ञ करायचे ठरवले. त्याला जोडून पुत्रकामेष्टी करायचेही ठरवले. त्याच्याच शब्दात-
कानी माझ्या घुमू लागली सादाविण वाणी (अंतःस्फूर्ती)
ती वाणी मज म्हणे, ‘दशरथा, अश्वमेध तू करी
यामुळे उल्हसित होऊन दशरथ कौसल्येला आत्मविश्वासाने म्हणतो-
सरयूतीरी यज्ञ करू गे, मुक्त करांनी दान करू
शेवटचा हा यत्न करू गे, अंती अवभृत स्नान करू
ईप्सित ते देइल अग्नी अनंत हातांनी… लाडके कौसल्येराणी
यानंतर ऋष्यशृंग ऋषींना यज्ञाचे पुरोहित म्हणून आमंत्रित केले जाते. पुत्रकामेष्टी करण्यापूर्वी ऋष्यशृंग ऋषींचा विवाह दशरथाची मानसपुत्री शांता हिच्याशी केला जातो. यज्ञ यथाविधी, यथासांग, शास्त्रशुद्ध रीतीने संपन्न होतो. अखेरीस प्रसादकुंभ घेऊन अग्निदेव प्रकटतो नि दशरथाला ते यज्ञसिद्ध, पवित्र पायसदान देतो. अत्यंत प्रेमाने राजा दशरथ ते आपल्या तिन्ही मुख्य राण्यांना वाटून देतो. प्रसादाचा द्रोण हातात घेऊन प्रार्थना करत असताना सुमित्रेच्या हातातील द्रोण एक घार घेऊन जाते म्हणून कौसल्या आपल्या पायसातला एक भाग सुमित्रेला देते. कैकयीही असेच करते. त्यातून सुमित्रेला जुळी मुलं होतात. लक्ष्मण जो आजन्म रामाबरोबर राहतो नि शत्रुघ्न जो कायम भरताबरोबर असतो. असे हे चार तेजस्वी यज्ञपुत्र!
पुत्रजन्मानंतर अर्थातच अयोध्यावासीयांना आकाशाएवढा आनंद होतो. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ हे त्या काळात जणू अयोध्यागीत (जसं राष्ट्रगीत) बनले होते. रामादी बालकांचे जन्म हा साऱ्या अयोध्येचा भाग्यपर्वकाल होता.
या साऱ्या घटनाप्रवाहात आपल्यासाठी अनेक संस्कार दडले आहेत. काही प्रमुख असे-
- नियती नावाची शक्ती अनेकांचे जीवन नियंत्रित करते. ती अटळ अशीच असते.
- व्यक्तीच्या जीवनातील घटना पूर्वनियोजित असतात. त्या ज्याच्या-त्याच्या पूर्वकर्मानुसार घडत असतात.
- या पूर्वकर्मांचा देवाशी किंवा दैवाशी संबंध नसून ती कर्मे प्रारब्धानुसार प्रत्येकाला भोगावी लागतात. हा कर्मफलन्याय अनेक विचारवंत ‘कारण (कॉज) नि परिणाम (इफेक्ट)’ या सिद्धांतासारखा अटळ मानतात.
- येथे प्रयत्नांना स्थान निश्चितच आहे. पण त्याचे फळ आपल्या अपेक्षेनुसार मिळतेच असे नाही.
- हे सारे घडत असताना जीवनाचा सस्मित स्वीकार करणे नि आनंदात राहणे सदैव शक्य आहे. प्रयत्न नि प्रयोग मात्र करत राहिले पाहिजे. यातूनच संस्कार रामायण जीवनात साकार होईल.