डॉन बॉस्कोतील ‘ते’ दिवस…

0
110
  • शरत्चंद्र देशप्रभू

आता पाहिले तर सारे नीतिशास्त्राचे, नागरिकशास्त्राचे सिद्धांत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. कदाचित हे जीवघेण्या स्पर्धेचे फळ असेल किंवा सापेक्ष बदलांचे फलित असू शकेल. आता नीतिमत्ता उपदेशापुरती शिल्लक राहिल्याचे संकेत मिळतात.

आमच्या शिक्षणाची आबाळ झाली नसली तरी थोडीफार फरफटच झाली. मुक्तीपूर्व काळात प्राथमिक शिक्षण मराठीतून झाल्यावर पोर्तुगीज शिक्षणाला आरंभ केला. दोन वर्षांनी गोवा मुक्त झाला अन्‌‍ साहजिकच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणे अनिवार्य ठरले. प्रवेश प्रो. महात्मेंच्या पणजीतील संस्थेत मिळाला. शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत वडिलांना दमणला जाण्याचा आदेश आला. येथे अन्य पर्याय नसल्यामुळे इंग्रजी माध्यम असलेल्या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. वर्षअखेरीस पुनश्च वडिलांची बदली गोव्यात झाली, अन्‌‍ मग आमचे वास्तव्य पणजीत भाड्याच्या घरात. ही मध्यवर्ती जागा. डॉन बॉस्को हायस्कूलजवळच. शिवाय वडिलांना पाद्रींच्या शैक्षणिक संस्थेतील कडक शिस्तीबद्दल कमालीचा आदर. यामुळे माद्री ते पाद्री असे आमचे शैक्षणिक स्थलांतर झाले.
राहत्या घरापासून डॉन बॉस्को पायी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर. त्याकाळी, म्हणजे 1964-65 च्या दरम्यान शाळेची जुनी इमारत छोटीशीच, परंतु दुमजली पिवळ्या रंगाची. भोवताली प्रशस्त जागा. चार फुटबॉल मैदाने मावतील एवढी! बोर्डर्सना एक वेगळी इमारत. हे बोर्डर्स गोव्याच्या ग्रामीण भागातून आलेले. मुख्यतः उत्तर गोव्याच्या चोडण, दिवाडी, सांत इस्तेव्ह, पिलार या गावांतील. दररोज येथून ये-जा करण्यासाठी वाहतूकव्यवस्था नसल्यामुळे ही पर्यायी व्यवस्था. या बोर्डरांची राहण्या-जेवणाची व्यवस्था शिस्तशीर वातावरणात.
अधूनमधून पालक येत. बहुधा आई म्हणजे ‘माय.’ वर्गातून ‘माय’ येताना पाहिल्यावर या बोर्डरांच्या चेहऱ्यावर विविध भाव उमटत. उत्कंठा, आनंद, आतुरता एका बाजूला, तर ही ‘माय’ आपली ग्राम्य बोली अन्‌‍ वागणुकीमुळे बाका प्रसंग निर्माण करील ही अस्वस्थता! यामुळे भर वर्गात पण हे बोर्डर विद्यार्थी आपल्या नातेवाइकांना हातवारे करून कुठे थांबायचे, कुठे बसायचे याचे मूक संकेत देत. गळाभेट झाल्यावर मायेने शिजवून आणलेले अन्नपदार्थ आपापल्या पाल्यांच्या तोंडात कोंबत. आपला पाल्य मेसचे जेवण जेवून कंटाळला असेल म्हणून हा आटापिटा. बोर्डर पण रोजच्या न्याहारीसाठी असलेले चण्याचे ‘भोरभोरे’ खाऊन विटलेले. खासकरून मध्यंतराच्या काळात हा भक्ष्यणाचा कार्यक्रम आखला जात असे. नंतरची तात्पुरती परंतु अटळ ताटातूट जीवघेणी! अश्रूंचा पूर अन्‌‍ निरोपाचे दृष्टीआड होईपर्यंत हलवलेले हात! त्याकाळी कॅथलिक कुटुंबीयांना या हायस्कूलचा फार मोठा आधार. आता काळपरत्वे या स्कूलचा बोर्डिंग विभाग बंद झाला.

या हायस्कुलात दमणहून आल्यावर दहावीत प्रवेश घेतला अन्‌‍ अकरावी म्हणजे शालान्त परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत दोन वर्षे सलग शिक्षण घेतले. इथले व्यवस्थापन सेलिझियन फादर्सचे. रोमन कॅथलिकपासून हा पंथ वेगळा. धर्म एकच. कॅथलिक धर्मीयांत वेगवेगळे पंथ निर्माण झाले, त्यांतलाच हा एक. शिक्षणाला वाहून घेणारा. समावेशी वैशिष्ट्यामुळे या पंथाच्या शिक्षणसंस्था अन्य धर्मीयांसाठी पण आदरणीय! आमच्या वेळी व्यवस्थापन पाहणारी अन्‌‍ शिकवणारी पाद्रीमंडळी सेलिझियन. याला अपवाद फादर साल्ढाना, जे रोमन कॅथलिक पंथाशी संलग्न होते. त्याकाळी या संस्थेच्या प्रमुखपदी फादर डेनिस होते. त्यांना ‘फादर रेक्टर’ असे संबोधत. या उच्चशिक्षित फादरना संस्थेचा जरा जास्तच अभिमान, सुप्त अहंकाराच्या छटेने लपेटलेला. कुठल्याही दात्याची मनमानी त्यांनी कधी खपवून घेतली नाही. विद्वत्ता असूनही शिकवण्याचे कसब यांना लाभले नव्हते. इंग्रजी विषयाच्या तासिकेत अवांतर गोष्टींना महत्त्व. त्याकाळी शिक्षणसंस्थांना प्रिलिमिनरी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेचा अर्ज नाकारण्याचा अधिकार होता. परंतु कर्मधर्मसंयोगाने त्याच वर्षी शिक्षण खात्याने शिक्षण संस्थांच्या या अधिकारावर निर्बंध आणले. याचा फायदा उठवून तीन विद्यार्थ्यांनी शिक्षण खात्याकडून या संस्थेला शालान्त परीक्षेसाठी फॉर्म्स देण्याचे निर्देश आणले. त्यावेळचा फादर डेनिस यांचा रुद्रावतार आठवतो. अनुदानप्राप्त संस्था असल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. कोवळ्या वयात फादर डेनिसचीही वागणूक आदरभावाला तडा देणारी ठरली. फादर अंतर्गत परीक्षेचे पेपर पण तपासण्याची तसदी घेत नसत. ते काम माँतगिरी येथील ज्येजुईट सिस्टर करत असे. काही का असेना, फादरच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाबद्दल वाद नव्हता. सामाजिक अन्‌‍ प्रशासकीय वर्तुळात फादर डेनिस यांनी एक आगळे स्थान निर्माण केले होते. सावळ्या रूपाकडे झुकलेल्या, टक्कल पडलेल्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत असल्याचे त्या वयात पण जाणवत होते. अपेक्षित मार्दव चेहऱ्यावर नसले तरी कृतीतून ते व्यक्त होत असे. गरजू विद्यार्थ्यांना शिकवणीचे पैसे, सहलीचा खर्च, मेडल्स अशा रूपाने ते मदत करीत.

यांच्यानंतरच्या दर्जावर फादर प्रिफेक्ट. यांचे नाव आठवत नाही. परंतु नागरिकशास्त्र हा विषय शिकवत. यांचे अस्तित्व शैक्षणिक विभागात तसेच अल्पच. फादर कास्ती हे त्यामानाने तरुण अन्‌‍ उत्साही. अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या वयात यांच्यावर ‘हेडमास्टर’ या पदाची जबाबदारी आली होती. बुटके, गोरेपान, काटक अंगयष्टी असलेले हे फादर इटली देशातील; परंतु गोव्याच्या विद्यार्थिजगतात पूर्णपणे समरस झालेले. हे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत. यांचे ज्युडो क्लासेस लोकप्रिय. विविध डावपेच ते विद्यार्थ्यांना शिकवत. छोट्या चणीचे हे गृहस्थ अवजड वजनाच्या प्रतिस्पर्ध्यालाही लीलया पाठीवरून फेकून टाकत. फुटबॉलचे प्रशिक्षण ते विद्यार्थ्यांना देत असत. निरागस बाल्य त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असे. तणावरहित देहबोली. हे रेक्टरपदी आल्यावर त्यांनी डॉन बॉस्को नाईट स्कूलची मुहूर्तमेढ रोवली. येथेच मला शिकवण्याचा अनुभव मिळाला. उतारवयात यांची भेट माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात झाली. तीस वर्षांनंतर पण स्कूलच्या रात्रीच्या क्लासेसना मी दिलेल्या वेतनमुक्त सेवेची त्यांना आठवण होती. अलीकडेच ते वारल्याचे कळले. निष्काम कर्मयोग म्हणजे फादर कास्तीचे समर्पित जीवन.

फादर मारियोना हे स्वीत्झर्लंड या देशातील. निळे डोळे, गौर कांती अन्‌‍ शुभ्र दाढी असलेले हे फादर म्हणजे मुलांसाठी कायमचे सांताक्लॉज. लहानातल्या लहान मुलाशी जोडण्याची हातोटी यांना साधली होती. ती निरागसता त्यांना जन्मजात लाभली असावी. हे सदा हसतमुख अन्‌‍ कार्यरत. हळूच मुलाच्या मागे येऊन गालांना दाढीचा स्पर्श करून चकीत करणे हा यांचा उपद्व्याप. यांच्या अस्तित्वामुळे संस्थेच्या कठोर चौकटीला मार्दवाचा ओलावा अन्‌‍ लवचीकता येत असे. रुक्ष वाळवंटात आनंदाचे मळे फुलत. यामुळे स्कुलातील मुलांना वातावरण सुसह्य होई.

फादर जेकब सहजशैलीने रसायनशास्त्र शिकवत. इंग्रजी शब्द ‘डेक्रिपिटेट्‌‍स’ म्हणजे तडतडणे आगळ्या शैलीत उच्चारत. ‘कॅसक’ म्हणजे पाद्रीचा झगा हे बनियानशिवाय चढवत. मुलांना हेच कुतूहल. परंतु त्यांनी शिकवलेला ‘टँटलस’ सिद्धांत अजून आठवतो.
मिसेस फिगरेदो म्हणजे आदर्श शिक्षिका. भूगोल व फ्रेंच हे विषय शिकवण्यात यांचा हातखंडा. ज्युल व्हेर्नच्या ‘ओतूर द ला लून’ या नवलिकेवर यांनीच व्याख्यान द्यावे. लेखकाचा कल्पनाविलास उलगडून दाखवण्याचे अनोखे कसब! या लेखकाच्या कल्पनाविश्वावरच शास्त्रज्ञांनी चांद्र मोहिमेचा आराखडा आखल्याचे संकेत या शिक्षिकेच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. शालीन व्यक्तिमत्त्व लाभलेली ही शिक्षिका भेटल्यावर आस्थेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, कुटुंबाची चौकशी करी. ही व्यक्ती काळाच्या पडद्यामागे गेली, परंतु ज्ञानामृताची गोडी कायम राहिली.

गणित विषयाचे शिक्षक कै. जनार्दन कामत आठवतात. उच्चशिक्षित असून पण शाळेत नोकरी पत्करली. नंतर शिकवण्याचे घरातच क्लासेस उघडले. अल्प किंवा विना मोबदल्यात विद्यार्थ्यांची गणित या विषयात पक्की तयारी करून घेण्यात यांचा हातखंडा. स्कुलाजवळच असलेल्या चौसोपी वाड्याच्या अंधाऱ्या कोंदट वातावरणात यांच्या शिकवण्या चालत. बथ्थड डोक्याचे विद्यार्थी पण यांच्या परिसस्पर्शाने उजळून जात. उतारवयात त्यांनी आधुनिक गणित क्षेत्रात पण प्रभुत्व मिळवले अन्‌‍ उच्च महाविद्यालयीन विद्यार्थांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे अलगदपणे निराकरण केले. चौसोपी वाड्याचे रूपांतर इमारतीत झाले. ज्ञानार्जन चालूच राहिले. ओठावरच्या मिशीची बाजू एका नाकपुडीत अडकवत शिकवण्याची यांची ढब अजून आठवते. फळ्यावर गणित सोडवले की ते डोक्यात शिरलेच म्हणून समजायचे.

अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने व्यावसायिकतेचा सोस न धरता जना कामतांनी केलेली अविरत सेवा म्हणजे तत्कालीन शिक्षकी पेशाचे जागते प्रतिबिंब. फादर साल्ढाणा पोर्तुगीज शिकवत, तर पै हिंदी शिकवत. पै यांची डोळे मिटून शिकवण्याची पद्धत अद्वितीयच! खुर्चीत रेलून, मान मागे टेकवून, डोळे मिटून एकाच सुरात, लयीत पैंच्या तोंडातून शब्द बाहेर पडत अन्‌‍ मुले पण दंगामस्ती न करता ही अक्षरशः झोपेतली शिकवण आत्मसात करत अन्‌‍ परीक्षेत उत्तीर्ण होत. अजब गोवा, अजब शिक्षक अन्‌‍ अजब विद्यार्थी!

शेवटच्या वर्षी विशीतले एक तरुण हिंदी शिक्षक अवतरले. प्रकाश शेजवलकर. अलीकडेच हे वारल्याचे वृत्त कानी पडले. अभ्यासाव्यतिरिक्त यांना बॉक्सिंग या विषयात रस. त्याकाळचा मुष्टियोद्धा सोनी लिस्टन यांचा आदर्श. कॅथलिक विद्यार्थ्यांच्या गळी हिंदीचे व्याकरण उतरवताना यांची दमछाक होत असे. शिस्तप्रिय संस्थेला हे फॅशनेबल, सिनेमाविषयी गप्पागोष्टी करणारे शिक्षक कसे परवडले कोण जाणे! कारण आठवते, एका बोर्डरच्या दप्तरात त्यावेळचे सिने पाक्षिक- ‘पिक्चर पोस्ट’- मिळाल्यामुळे शिक्षा भोगावी लागली होती. त्याकाळी मुक्तीनंतरच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळे पोर्तुगीज नावाचे रूपांतर इंग्रजीत करण्याची चढाओढ लागून राहिली होती. ‘कायतान’चे कॅजटन, रुमेवचे ‘रोमियो’, ‘पेद्रू’चे पिटर; परंतु ‘ग्राव’चे रूपांतर ‘ग्रॅम’ झाल्यावर तो विद्यार्थी चरफडल्याचे स्मरते. डॉन बॉस्को जरी शिस्तीसाठी लोकप्रिय असले तरी इथल्या विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेत कधी पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांत मानांकन कमावले नाही. परंतु येथे शिकलेल्या विद्यार्थ्याचे आंग्ल भाषेवर प्रभुत्व असायचे.

या संस्थेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कॅथलिक विद्यार्थ्यांना धर्मशास्त्रावर विषय असायचा, तर हिंदू विद्यार्थ्यांसाठी ‘मोरल सायन्स’ म्हणजे नीतिशास्त्र. शिवाय नागरिकशास्त्र अभ्यासक्रमाचा भाग होता. आता पाहिले तर सारे नीतिशास्त्राचे, नागरिकशास्त्राचे सिद्धांत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. कदाचित हे जीवघेण्या स्पर्धेचे फळ असेल किंवा सापेक्ष बदलांचे फलित असू शकेल. आता नीतिमत्ता उपदेशापुरती शिल्लक राहिल्याचे संकेत मिळतात. कृती विपरित. नीतिमत्तेची कास धरणारे अवघेच आपल्या बुद्धिचातुर्याने या स्पर्धेत तरल्याचे दिसत आहे. सरळ रेषेत चालणारा, कमकुवत बौद्धिक क्षमता असलेला आजच्या शर्यतीत दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे. आजच्या युगात भांडवलदारांना, नेत्यांना, शास्त्रज्ञांना स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर नीतिमत्तेला सोडचिठ्ठी द्यावी लागते. शाश्वत मूल्यांना व्यावहारिक मुलामा द्यावा लागतो. यश मिळते, परंतु तात्कालिक. यातून व्यवस्था पोखरत जाते. दुष्परिणाम आरंभी जाणवत नाहीत, विघटनांचे सुप्त बळी रोखता येत नाहीत. इतिहासाचा वेध घेतला तर महान संस्कृतीचा लय नैसर्गिक कारणांपेक्षा अंतर्गत अपयशामुळे झाल्याचे पुरावे मिळतात. फांदीवर बसून तीच फांदी तोडणाऱ्याला कोण समजावेल?