राज्यात नळाद्वारे पुरवल्या जाणार्या पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कण आहेत की नाही हे तपासण्याची सोय गोव्यातील प्रयोगशाळांत नाही असे काल पाणीपुरवठा खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले. ही तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने पुणे किंवा बेंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री पाऊसकर यांनी दिली.
नळाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी सुरक्षित आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. असे सांगून पाऊसकर यांनी, लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठीच आम्ही पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुणे अथवा बेंगळुरू येथे पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. गोव्यात १४ प्रयोगशाळा आहेत परंतु त्यातील एकाही प्रयोगशाळेत ही तपासणी होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.