पाणी बिलांसाठी क्युआर कोड सुविधा सुरू

0
32

>> गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते शुभारंभ; ‘हर घर जल’ प्रमाणपत्र प्रदान

राज्यातील १०० टक्के नागरिकांना नळांद्वारे स्वच्छ पाणी पुरवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले असून, त्यासाठी जलशक्ती मिशनद्वारे काल गोव्याला ‘हर घर जल’ प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी पाण्याची बिले ऑनलाईन भरण्यासाठी क्युआर कोड सुविधेचा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे राज्यातील लोकांना आता यापुढे क्युआर कोड सुविधेचा वापर करून अगदी काही क्षणांत पाण्याचे बिल भरता येणार आहे.

काल पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझामध्ये झालेल्या कार्यक्रमात गजेंद्र सिंग शेखावत यांनी हर घर जल प्रमाणपत्र राज्याला प्रदान केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. हर घर जल हे प्रमाणपत्र मिळवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. ही एक अत्यंत आनंदाची व समाधानाची बाब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, गोव्याबरोबरच दादरा, नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांनाही हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

पंतप्रधानांकडून अभिनंदन

यानिमित्त आभासी पद्धतीने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे विकासकामांबद्दल कौतुक केले. ‘हर घर जल’ योजनेसाठीचे प्रमाणपत्र मिळवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याबद्दल त्यांनी गोव्याचे अभिनंदनही केले.