सीबीआयची ३१ ठिकाणी छापेमारी

0
15

>> दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी कारवाई

मद्य धोरण घोटाळ्यामुळे अरविंद केजरीवालांचे दिल्लीतील सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. शुक्रवारी सकाळी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला. तसेच दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयने देशभरात ३१ ठिकाणी छापेमारी केली. त्यात त्यांना अनेक पुरावे मिळाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सीबीआयच्या हवाल्याने ही माहिती दिली. दिल्लीतील मद्य धोरणाविरोधात सीबीआयने १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाविरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासामुळे दिल्ली सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
सीबीआयने देशभरात काल ३१ विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, चंदीगढ, हैदराबाद, लखनऊ आणि बंगळुरुसह इतर ठिकाणांचा समावेश आहे. या छापेमारीमध्ये अनेक कागदपत्रे, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.

दिल्लीतील मद्य धोरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने शुक्रवारी मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा मारला. जवळपास १४ तास त्यांच्या घरी तपास करण्यात आला. सीबीआयने दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही मद्य कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिसोदिया यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही आहे.