पाणीटंचाई सोडवण्यासाठी धरणाचा प्रस्ताव

0
8

>> जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर; साळ येथे नवीन धरण बांधणार; उत्तर गोव्यासाठी फायदेशीर

उत्तर गोव्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तिळारी नदीवर साळ येथे नवीन बॅरेज अर्थात मोठे धरण उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

उत्तर गोव्यात पाण्याचा जास्त साठा करण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तिळारीतून पाण्याचा पुरवठा बंद झाल्यानंतर उत्तर गोव्यातील कळंगुट व इतर काही भागांत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो.

त्यावर तोडगा काढण्यासाठी तिळारी नदीवर साळ येथे नवीन धरण उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. साळ येथे तिळारी नदीवर जुना बंधारा आहे; मात्र त्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला जाऊ शकत नाही. तसेच जुन्या बंधार्‍यामुळे साठविलेल्या पाण्याच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे. नवीन तंत्रज्ञानाची वापर करून धरण उभारल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिळारी नदीचे पाणी साठवून ठेवले जाऊ शकते, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

जलस्त्रोत खात्याकडून शेतकर्‍यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा करणार्‍या कालव्यांची त्वरित व्यवस्था करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यास लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. पर्ये, सावर्डे, काणकोण या भागातील शेती कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वेळीच पाणी उपलब्ध केल्यास शेतीची कामे लवकर सुरू करता येणार आहेत, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाखाली तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सावर्डे मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकर्‍यांचे गट स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. या गटामध्ये जमीन असलेल्या युवकांना प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश या तालुक्यात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच काहीवेळा पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागते. काही दिवसांपूर्वी नळांना पाणी येत नसल्याने नागझर व तोरसे या गावातील नागरिक व महिला आक्रमक बनल्या होत्या. त्यांनी आंदोलन करत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारला होता. आता किमान या धरणामुळे तरी पाणीप्रश्‍न सुटेल अशी अपेक्षा आहे.

गावागावांत बंधारे बांधणार : शिरोडकर

जलस्त्रोत खात्याने ओहोळांवर लहान-लहान बंधारे उभारून गावागावांत पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. या बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग शेती, बागायतीसाठी केली जाऊ शकतो, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.