पाठिंब्याच्या फेरविचाराची सरदेसाईंना गरज भासणार नाही : भाजप

0
126

राज्यात खाण प्रश्‍नावर न्यायालयातून तोडगा काढला जाणार आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर फेरविचार करण्याची गरज भासणार नाही, असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला. खाणप्रश्‍नी अध्यादेशाची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील खाण प्रश्‍नावर त्वरित तोडगा न काढल्यास भाजपला आगामी लोकसभा निवडणूक महागात पडेल. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी गुरूवारी दिला आहे. त्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की, राज्यातील खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी खास अध्यादेश जारी करण्याची गरज नाही. केंद्रातील भाजप नेते खाण बंदीच्या प्रश्‍नावर गंभीर आहेत. न्यायालयाच्या माध्यमातून खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या माध्यमातून खाण बंदीच्या प्रश्‍नावर योग्य न्याय मिळेल, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

आजपासून जनसंपर्क अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ४ वर्षातील लोकोपयोगी योजना व विकास कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी २६ मे ते ११ जून दरम्यान जन संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशपातळीवर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या योजना, विकास कामाची माहिती जनतेपर्यंत पोचविली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले. भाजपचे मंत्री, आमदार, गाभा समिती आणि पदाधिकार्‍यांच्या काल झालेल्या बैठकीत जनसंपर्क अभियानावर चर्चा करण्यात आली. भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष या अभियानाअर्ंतंगत विविध धर्मगुरू, निवृत्त सनदी व इतर अधिकार्‍याशी संवाद साधणार आहेत. या अभियानानिमित्त केंद्र स्तरावरील नेते राज्याला भेट देतील, अशी माहिती सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

गोवा फॉरवर्ड, मगोप सरकारचा
पाठिंबा काढणार नाही : फ्रान्सिस
बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यास भाजपला अपयश आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसू शकतो असे विधान मंत्री विजय सरदेसाई यांनी केले असले तरी ते पर्रीकर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतील असा अर्थ कुणी काढू नये, असे काल नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. घटक पक्ष स्वतंत्र असल्याने ते सरकारला दिलेला पाठिंबा काढू शकतात. मात्र सद्यस्थितीत गोवा फॉरवर्ड किंवा मगो तसे करणार नाही असे ते म्हणाले.
सरकार अस्थिर करण्याचे अथवा सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचे विधान विजय सरदेसाई यांनी केलेले नाही ही बाब समजून घेण्याची गरज असल्याचे डिसोझा म्हणाले.