पाटणे-कोळंब येथील डझनभर पर्यटन कुटिरे जमिनदोस्त

0
134

>> सीआरझेड्‌च्या आदेशानुसार कारवाई

काणकोण नगरपालिका क्षेत्रातील कोळंब-पाटणे येथे उभारण्यात आलेली जवळपास डझनभर अनधिकृत पर्यटन कुटिरे काणकोण पालिकेने सीआरझेड्‌च्या आदेशानुसार जेसीबीच्या सहाय्याने काल जमिनदोस्त केली. मात्र, आगाऊ नोटीसी बजावण्यात आल्यामुळे काही लोकांनी स्वतः अनधिकृत बांधकामे हटविली. मात्र, जी शिल्लक बांधकामे होती ती जेसीबीचा वापर करून जमिनदोस्त करण्यात आली.
बांधकाम हटाव मोहिमेत काणकोणचे मुख्याधिकारी केदार नाईक, संयुक्त मामलेदार दत्तराज गावस देसाई, पालिका निरीक्षक येसो देसाई, नगर्से पाळोळेचे तलाठी रमेश नाईक, सीआरझेड्‌चे लवेश शिरोडकर या ठिकाणी उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आवश्यक पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली होती.
काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने २८ रोजी जी नोटीस बजावण्यात आली होती त्यानुसार सर्वे क्र. ८०/१ मधील एकूण ९ लोकांना आगाऊ सूचना देण्यात आली होती. त्यानुसार शॅक्स, तंबू मिळून एकूण ६७ बांधकामे हटविण्यात येणार असल्याचे म्हटले होते. बर्‍याच जणांनी आपण उभारलेली बांधकामे पूर्वीच हटविली होती. मात्र, मिलाग्रिज शाव्हिय कोर्त यांचा शॅक्स आणि तंबूच्या बांधकामाचा गोदाम त्याचप्रमाणे तंबू हटवून देखील ते उभारण्यासाठी तयार केलेले बांधकाम जेसीबीच्या आणि पालिकेच्या कामगारांकरवी उखडून काढण्यात आले. काणकोण पालिका २९ रोजी बांधकामे हटविण्याची मोहिम राबविणार असल्याचे समजल्याबरोबर या ठिकाणी स्थानिक लोकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, मिलाग्रिज शाव्हियर कोर्त गोव्याबाहेर असल्यामुळे उपस्थित नव्हते अशी माहिती मिळाली. पाटणे, कोळंब परिसर हा पूर्णपणे मच्छीमारी समाज बांधवांची लोकवस्ती असलेला भाग असून या ठिकाणी मच्छीमारी लोकांची पारंपरिक घरे आहेत. पूर्वापारपणे हे लाक या ठिकाणी राहात आले आहेत.
मच्छीमारी होड्या ठेवण्यासाठी लागणार्‍या झोपड्या आहेत. ज्या मूळ फिगरेदो या जमीन मालकाने ही जमीन २००७ साली व्हाइट राज रिसॉर्टला विकली त्यावेळी येथील पारंपरिक मच्छीमारी लोकांचा विचार करण्यात आला नाही. एकूण ३३ जणांची नावे १/१४ उतार्‍यावर आहेत, तर ६५ ते ७० घरे आणि अन्य बांधकामे असून त्यांना पालिकेचा रहिवासी नंबर आहे अशी माहिती प्रशांत काणकोणकर, अशोक पागी यांनी दिली. या पारंपरिक घरांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न चालू असल्याची माहिती नगरसेवक दिवाकर पागी, गुरू कोमरपंत यांनी दिली.