
लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील काल ७ राज्यांमध्ये झालेल्या मतदानादरम्यान जम्मू-काश्मीर व प. बंगाल या राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर हातबॉम्ब फेकण्यात आला. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकारही घडले.
पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ततेमुळे आतापर्यंत ४२४ लोकसभा मतदारसंघांमधील मतदान पार पडले आहे. उर्वरीत ११८ मतदारसंघांमध्ये १२ व १९ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, कालच्या टप्प्यातील मतदानादरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, युपीएच्या नेत्या सोनिया गांधी, कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, मेहबुबा मुफ्ती आदी दिग्गज नेत्यांचे भवितव्य सीलबंद झाले आहे.
काल उत्तर प्रदेशमध्ये १४, राजस्थानमध्ये १२ आणि प. बंगाल व मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी ७, बिहारमध्ये ५ व झारखंडमध्ये ४ जागांसाठी मतदान झाले.
प. बंगालात धुमश्चक्री
प. बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अर्जुन सिंग व सुरक्षा दलाचे जवान यांच्यात धक्काबुक्की झाली. मतदान केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करण्यापासून सिंग यांना जवानांनी रोखल्यानंतर हा प्रकार घडला. प. बंगालमधील बाणगाव, हावडा, हुगली येथेही हिंसक घटना घडल्याचे सांगण्यात आले. बेलमुरी येथे भाजप उमेदवार लॉकेट चटर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या रत्ना डे नाग यांना धमकावल्याची तक्रार करण्यात आली. अनेक ठिकाणी भाजप व तृणमूल कॉंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे झाली. बराकपूर येथील काही मतदान केंद्रावर फेरमतदानाची मागणी अर्जुन सिंग यांनी केली.
पुलवामात मतदान
केंद्रावर हातबॉम्ब
पुलवामा जिल्ह्यातील रोहमू येथील मतदान केंद्रावर हातबॉम्ब फेकण्याची घटना घडली. मात्र त्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.