पाक लष्कराकडून ७ दहशतवाद्यांना अटक

0
103

येथील ख्रिश्‍चन वसाहतीत व एका न्यायालयात दहशतवादी हल्ला करून १३ जणांना ठार केल्याप्रकरणी एका महिलेसह ७ दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. जनरल असिम सलीम बाजवा यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे. येथील एका ख्रिश्‍चन वसाहतीवरील हल्ल्याचे नियोजन या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात केले होते. त्यांचा एक साथीदार अफगाणिस्तानात आहे.

वरील सात दहशतवाद्यांपैकी तिघाना मर्दान येथील न्यायालयातील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात १२ जण ठार झाले होते. तर ख्रिश्‍चन वसाहतीवरील हल्ल्यात एक मृत्यूमुखी पडला होता. अटक केलेल्यांकडून तीन आत्मघाती जॅकटस् ताब्यात घेण्यात आल्याचे बसीत यांनी सांगितले.
वरील दोन्ही दहशतवादी हल्ल्यांसाठी काल अटक केलेल्या सातही जणांनी त्या हल्लेखोरांना ठिकाणांपर्यंत पोचण्यासाठी मदत केली होती. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था अफगाणिस्तानने तेथील अशा स्थितीबाबत आपली भूमिका योग्यरीत्या बजावल्यास अधिक सुधारू शकेल असेही बाजवा
म्हणाले.
दरम्यान, सदर अतिरेकी मर्दान पोलिस स्थानक तसेच नॅशनल बँकेवर हल्ला करण्यासाठी योजना आखत होते अशी माहितीही यावेळी बाजवा यांनी दिली.
या दहशतवाद्यांच्या अटकेसाठी पाक लष्कराने पेशावर शहरात सातत्यापूर्ण पध्दतीने शेकडो मोहिमा आखल्या. याशिवाय राजगल या दुर्गम पहाडी भागांमध्येही शोध मोहिम हाती घेतल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.