पाकिस्तान निवडणुकीत इम्रान समर्थकांची आघाडी

0
11

>> लष्कराच्या पाठिंब्यानंतरही नवाझ शरीफ द्वितीय स्थानावर

पाकिस्तानमधील नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान संपल्यानंतर 67 तासांनंतर सर्व जागांचे निकाल आले आहेत. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. यात इम्रान खान यांना समर्थन देणाऱ्या 101 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पीएमल-एन पक्षाने एकूण 75 जागांवर बाजी मारली आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 265 जागांवर निवडणूक झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, तर एका जागेचा निकाल फेटाळण्यात आला आहे. 15 फेब्रुवारीला येथे पुन्हा मतदान होणार आहे. उर्वरित 70 जागा राखीव आहेत.

इम्रान खान संध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच त्यांच्या पीटीआय पक्षाचे चिन्हही तात्पुरते गोठवण्यात आले. त्यामुळे इम्रान खान यांच्या पक्षातील नेत्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. तरीही इम्रान खान यांचे समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांनी अनेक जागांवर विजय संपादन केला आहे.

लष्कराचे शरीफ यांना समर्थन
पाकिस्तानी लष्कराने यावेळी आपली ताकद नवाझ शरीफ यांच्या पाठीमागे उभी केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवाझ शरीफ हेच बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष निकाल मात्र काहीसा वेगळा लागला आहे. नवाझ शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

पाकिस्तानमध्ये आंदोलन
पाकिस्तानात वेगवेगळ्या पक्षाचे समर्थक न आंदोलन करत असून पोलीस, सुरक्षा रक्षकांनी आतापर्यंत 300 जणांना ताब्यात घेतले आहे.

सत्तास्थापनेसाठी हालचाली

नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाकडून वेगवेगळ्या पक्षाला युतीसाठी पाचारण केले जात आहे. नवाझ शरीफ यांच्या पक्षातील नेते आझम नाझीर तारा यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. या गैरप्रकाराच्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, असे आझम यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे इम्रान खान यांचा पाठिंबा असलेल्या उमेदवारांनी नवाझ शरीफ, मरिअम शरीफ, माजी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विजयावर आक्षेप घेतला आहे.