पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अपात्र

0
91

>> बेनामी मालमत्ता प्रकरणी कोर्टाचा दणका
>> राजीनामा सादर

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी असल्याचा निवाडा दिला असून पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरवले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या दणक्यानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याजागी नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल देताना शरीफ यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे पाच सदस्यांच्या खंडपीठाने शरीफ यांना दोषी ठरवताना एकमताने निर्णय दिला आहे. शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागणार आहे, असे न्या. एजाज अफजल खान यांनी निकाल देताना म्हटले. या निकालाचे संकेत न्यायालयाने १८ जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्यासह मुले हसन, हुसैन व मरियम यांनाही दोषी ठरवले आहे. त्यांच्याविरोधात प्रकरणांची चौकशी ‘नॅब’कडे (नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो) देण्यात आली आहे. याशिवाय चौकशी समितीद्वारे जमा केलेले सर्व दस्तऐवज सहा आठवड्यांच्या आत ‘नॅब’कडे सोपवावेत व सुनावणी सुरू झाल्यापासून महिन्याच्या आत या प्रकरणी निकाल देण्याचा आदेशही नॅबला देण्यात आला आहे.
शरीफ यांच्यावर लंडनमध्ये बेनामी मालमत्ता जमवल्याचा आरोप होता. पनामा पेपर प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चौकशीसाठी संयुक्त समिती स्थापन केली होती. या समितीने १० जुलै रोजी सादर केलेल्या अहवालात शरीफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. शरीफ कुटुंबीयांच्या व्यावसायिक व्यवहारांचा तपास करणार्‍या या समितीने शरीफ यांच्यासह त्यांची मुले हसन व हुसेन तसेच मुलगी मरयम नवाझ यांच्याविरोधात नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो अध्यादेश १९९९ खाली गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस केली होती.पाकिस्तानात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असून तोपर्यंत सत्ता कुणाकडे सोपवण्यात यावी याची गणिते शरीफ मांडीत आहेत. सद्यःस्थितीत त्यांचे भाऊ शहबाज शरीफ यांचे नाव अग्रणी आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर खबरदारी म्हणून इस्लामाबाद व रावळपिंडीमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस व सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या शहरांत तैनात करण्यात आल्या आहेत.