पाकच्या घशात गेलेल्या वायव्य सरहद्द प्रांताची कहाणी

0
766

एडिटर्स चॉइस

  • परेश प्रभू

पाकिस्तानात समाविष्ट झालेले इतर प्रांत आणि वायव्य सरहद्द प्रांत (आजचा खैबर पख्तुनख्वा) यांच्यातील एक मोठा आणि अतिशय महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे जेव्हा फाळणीद्वारे पाकिस्तानची निर्मिती होण्याचे घाटत होते, तेव्हा या वायव्य सरहद्द प्रांताने मुस्लीम लीगचे नव्हे, तर कॉंग्रेसचे सरकार निवडून दिलेले होते. जिनांचा द्विराष्ट्र सिद्धान्त जणू तेथील ९२ टक्के असलेल्या मुस्लीम जनतेने त्याद्वारे नाकारला होता.

 

काश्मीरचे विशेषाधिकार काढून घेतल्यापासून पाकव्याप्त काश्मीरवरील भारताच्या अधिकाराचा विषय ऐरणीवर आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी तो जाहीरपणे व्यक्तही केला. आता जेव्हा पाकिस्तानकडून काश्मीरबाबत चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा आग्रह धरला जाईल, तेव्हा पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल असे राजनाथसिंगांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा भाग असलेले, परंतु मनाने अजूनही त्याच्याशी पूर्णतः समरस न झालेले बलुचिस्तान, गिलगिट बाल्टीस्तान, खैबर पख्तुनख्वा आदी प्रांत आणि तेथे पाकिस्तानी सैन्याने सतत चालवलेले मानवाधिकारांचे हनन याकडे भारतीयांचे लक्ष वेधले गेले आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच एक नवे पुस्तक हाती आले, ज्याचे नाव आहे, ‘इंडियाज् लॉस्ट फ्रंटियर’ आणि लेखक आहेत राघवेंद्र सिंग. राघवेंद्र सिंग हे प्रख्यात आयएएस अधिकारी आहेत. भारतीय पुराभिलेखाचे महासंचालक म्हणून त्यांची कारकीर्द आणि पुराणवास्तूंच्या संवर्धनातील त्यांचे योगदान गाजले आहे.
अर्थातच ही कहाणी आहे पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांताची, ज्याला आज खैबर पख्तुनख्वा असे संबोधले जाते. एकेकाळी भारताचा भाग असलेला हा वायव्य सरहद्द प्रांत आणि तेथील खान अब्दुल गफार खान यांचे आणि त्यांच्या खुदाई खिदमतगारचे कार्य, त्यांचा ‘सरहद्द गांधी’ असा गौरवाने होणारा उल्लेख हे सगळे आपण इतिहासामध्ये वाचलेले आहे. फाळणीनंतर तो सारा भाग पाकिस्तानात गेला. परंतु पाकिस्तानात समाविष्ट झालेले इतर प्रांत आणि हा वायव्य सरहद्द प्रांत यांच्यात एक मोठा आणि अतिशय महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे जेव्हा फाळणीद्वारे पाकिस्तानची निर्मिती होण्याचे घाटत होते, तेव्हा या वायव्य सरहद्द प्रांताने मुस्लीम लीगचे नव्हे, तर कॉंग्रेसचे सरकार निवडून दिलेले होते. जिनांचा द्विराष्ट्र सिद्धान्त जणू तेथील जनतेने त्याद्वारे नाकारला होता. मुस्लीम बहुसंख्य प्रांत असून देखील फेब्रुवारी १९४६ मध्ये झालेल्या प्रांतिक निवडणुकांत तत्कालीन राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरकार निवडून आणणे हा जणू चमत्कार होता. त्यातून त्या प्रदेशाने आणि तेथील नेत्यांनी ब्रिटिशांची इतराजीही ओढवून घेतली. कॉंग्रेसचे ते सरकार फाळणीनंतर बरखास्त केले गेले आणि जवळजवळ जबरदस्तीने पाकिस्तानात सामील केले गेले. राघवेंद्र सिंग यांचे हे तब्बल ४९१ पानी पुस्तक त्याचीच ऐतिहासिक कहाणी आहे. हा वायव्य सरहद्द प्रांत भारताने का आणि कसा गमावला त्याचे अतिशय अभ्यासपूर्ण असे विश्लेषण लेखकाने या पुस्तकातून तपशिलाने आणि सप्रमाण केलेले आहे.

जो प्रांत कॉंग्रेसचे मंत्रिमंडळ निवडून देतो, तो एका वर्षभरातच पाकिस्तानमध्ये सामील का होतो त्याची ही कहाणी आहे. खान अब्दुल गफार खान आणि त्यांचे बंधू यांच्याशी गांधीजी वगळता कॉंग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी केलेली प्रतारणा, त्यातून त्यांच्या वाट्याला आलेले दुर्दैवाचे भोग आणि त्याची परिणती म्हणून त्यांच्या मनामध्ये राहून गेलेला सल हे सगळे अस्वस्थ करणारे आहे.

४६ च्या प्रांतिक निवडणुकीत कॉंग्रेसचे सरकार निवडून देणारा हा वायव्य सरहद्द प्रांत मुस्लीमबहुलच होता. तेथे ९२ टक्के जनता ही मुसलमान होती. परंतु तरीही जिनांच्या मुस्लीम लिगला स्थान न देता ती खान अब्दुल गफार खान आणि त्यांच्या बंधूंच्या पाठीशी उभी राहिली होती. मुस्लील लीग त्या प्रांतिक विधिमंडळात अल्पमतात होता. ब्रिटिशांच्या नाकाला अर्थातच त्यामुळे मिरच्या झोंबल्या. ज्यावेळी ब्रिटिश भारताच्या फाळणीचा घाट घालत होते, तेव्हा मध्य पूर्वेतील आपले स्थानही अबाधित राखायचे होते. सोव्हिएतांच्या तेथील वाढत्या हस्तक्षेपाला शह देण्यासाठी कच्च्या तेलाचा प्रमुख स्त्रोत असलेला तो प्रदेश आणि त्याकडे जाणारा हवाई मार्ग स्वतःच्या प्रभावाखाली ठेवण्यात ब्रिटिशाना स्वारस्य होते. त्यामुळेच फाळणीच्या वेळेस पाकिस्तानच्या बाजूने झुकते माप देण्याकडे त्यांचा कल राहिला असे लेखकाचे प्रतिपादन आहे.

ब्रिटिशांच्या ताब्यातील भारताच्या हद्दी फाळणीपूर्वी विस्तीर्ण होत्या. जगातील सर्वांत लांब सीमा म्हणून त्यांची गणना होत असे. ब्रिटिश भारताच्या या सीमा अगदी चीन, सयाम, तिबेट, रशिया, पर्शिया, नेपाळ, अफगाणिस्तानपर्यंत जाऊन भिडलेल्या होत्या. ख्रिस्त पूवर्र् ३२७ – ३२६ मधील अलेक्झांडरपासून इ. स. १७३८ – ३९ मधील नादिरशहापर्यंत भारतावर झालेली आक्रमणे आजच्या पाकिस्तानच्या वाटेने, हिंदुकुश पर्वताच्या परिसरातूनच झाली.

भारतीय स्वातंत्र्यावेळी फाळणीने सारी समीकरणेच पालटून टाकली. पं. नेहरूंनी शेवटचा ब्रिटीश व्हॉईसरॉय माऊंटबॅटनशी फाळणीच्या ज्या सुधारित योजनेला सहमती दिली, त्यामध्ये वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानच्या घशात घातला गेला. तेथील जनमत आजमावण्यापूर्वीच तो प्रांत पाकिस्तानला देऊन टाकण्यात आला. भारताचा शेवटचा व्हाईसरॉय लुईस माऊंटबॅटन हा राणी व्हिक्टोरियाचा पणतू होता. राणीची सर्वांत धाकटी मुलगी बॅटनबर्गशी विवाहबद्ध झाली होती. वास्तविक माऊंटबॅटनची नौदलातील सारी कारकीर्द अपयशी ठरली होती, परंतु केवळ शाही घराण्याशी असलेल्या नात्यामुळे त्याला पदोन्नती मिळत गेली आणि व्हाईसरॉयपर्यंत तो वर चढू शकला. माऊंटबॅटन भारतात आला आणि अवघ्या ४९ दिवसांत त्याने भारताच्या फाळणीचा निर्णय घेतला. आणखी २१ दिवसांच्या आत तो जाहीर करण्यात आला आणि प्रत्यक्ष कार्यवाही व्हायला पुढचे ७७ दिवस लागले याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे.

देशाची फाळणी झाली तेव्हा तिच्या नक्की सीमारेषा कोणत्या हे स्पष्ट नव्हते. त्यानंतर रेडक्लीफ रेषा, ड्युरांड रेषा आदींद्वारे ती निश्‍चिती करण्यात आली, खरे तर भारताला स्वातंत्र्य देण्याची आणि फाळणीची प्रक्रिया १ जून ४८ पर्यंत पूर्ण होणार नाही असा अंदाज होता, परंतु ती तारीख मागे आणली गेली. आधी ३१ डिसेंबर ४७ ही तारीख निश्‍चित करण्यात आली व नंतर ती आणखी अलीकडे आणून १४ व १५ ऑगस्ट १९४७ ही तारीख निश्‍चित झाली आणि भारताची तीन शकले उडवली गेली.
वायव्य सरहद्द प्रांताचा बळी दिला गेला तेव्हा कॉंग्रेस नेतृत्वानेही खान अब्दुल गफार खान यांना वार्‍यावर सोडले. केवळ महात्मा गांधी त्यांच्या पाठीशी होते. माऊंटबॅटन जेव्हा २० मार्च १९४७ रोजी पहिल्यांदा भारतात आला, तेव्हा त्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या गांधी, नेहरू आणि जिना या तीन नेत्यांना भेटीला बोलावले होते. तेव्हा गांधींनी वायव्य सरहद्द प्रांताचा विषय माऊंटबॅटनकडे काढला होता. तेथील तत्कालीन गव्हर्नर ओलेफ कॅरोची तक्रारही केली होती. ते पक्षपाती आहेत अशी गांधीजींची तक्रार होती.

कॉंग्रेसने फाळणी स्वीकारल्याने खान अब्दुल गफार खान व्यथित झाले होते. आपल्याला भारताने दूर केले आणि आता पाकिस्तानातही जागा नसेल अशी त्यांची भावना बनली. कॉंग्रेस नेतृत्वाने त्यांचा भ्रमनिरास केला होता. गांधीजी कोलकत्याला जायला निघाले तेव्हा खान अब्दुल गफार खान त्यांना निरोप द्यायला रेल्वे स्थानकावर गेले. ‘‘महात्माजी, मी तुमचा सैनिक आहे. तुमचा शब्द माझ्यासाठी कायदा आहे. तुमच्यावर माझा पूर्ण भरवसा आहे, परंतु आज आपलेही पाठबळ नाही’’ अशी व्यथा त्यांनी गांधीजींकडे व्यक्त केली होती. महात्मा गांधींनाही वायव्य सरहद्द प्रांतासंदर्भातील ब्रिटिशांच्या कुटील नीतीची कल्पना आली होती. त्यांनी रेल्वे प्रवासातच माऊंटबॅटनला पत्र लिहिले की वायव्य सरहद्द प्रांतामध्ये जनमत घेणे घातक ठरेल. परंतु कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनी शरणागती पत्करलेली होती. वायव्य सरहद्द प्रांताचा घास पाकिस्तानच्या घशात घालण्यात आला.

खान अब्दुल गफार खान यांना या सार्‍या घटनाक्रमाने अत्यंत व्यथित केले. त्यांच्या गांधीजींशी झालेल्या पत्रव्यवहारात त्याचे लख्ख प्रतिबिंब पडलेले दिसते. ‘महात्माजी, तुम्ही आता आम्हाला पाकिस्तानी म्हणणार?’ असा त्यांचा आर्त सवाल होता. नोव्हेंबर ४७ मध्ये गांधींनी खान यांना पत्र लिहिले होते की तुम्ही भारतात या. अहिंसेच्या मार्गाने तुमचे कार्य येथे चालवा, परंतु दुर्दैवाने त्यानंतर काही महिन्यांतच महात्माजींची हत्या झाली.

सरहद्द गांधी म्हणून गौरवल्या गेलेल्या खान अब्दुल गफार खान यांचा मृत्यू २८ जानेवारी १९८८ रोजी झाला. तेव्हा राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. सरहद्द गांधींच्या मृत्यूविषयी कळताच ते तातडीने पेशावरला गेले. भारताने आणि अफगाणिस्ताननेही सरहद्द गांधींच्या निधनानिमित्ताने दुखवटा पाळला, पण पाकिस्तानी पार्लमेंटचे तेव्हा अधिवेशन सुरू असूनही त्यांच्या निधनाचा साधा उल्लेख देखील तेथे करण्यात आला नाही, याची नोंद लेखकाने घेतली आहे.

एकेकाळचा वायव्य सरहद्द प्रांत आज खैबर पख्तुनख्वा या नावाने पाकिस्तानात समाविष्ट झालेला आहे. पाकिस्तान इस्लामच्या आधारावर एक देश म्हणून निर्माण केला गेला तरी प्रत्यक्षात तो एकसंध नाही. पाकिस्तान हे एक राष्ट्र नाही तर फेडरेशन आहे असे लेखकाला वाटते. त्याची कारणमीमांसा सांगताना तो सांगतो, पाकिस्तानी लष्करामध्ये पंजाब्यांचा वरचष्मा आहे. पख्तुनांचे प्रमाण जेमतेम २० टक्के आहे. बलुच व सिंधींना तर त्यात प्रतिनिधित्वही नाही. ऊर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणावी, तर या विविध प्रांतांमध्ये ऊर्दू ही दुसरी भाषा आहे. बलुच, सिंधी, मुहाजिरांना आजही पंजाब्यांचे वर्चस्व अमान्य आहे. पाकिस्तानमध्ये विविध प्रांतांमधून उठावाचे प्रयत्न होतात व लष्करी बळावर ते वेळोवेळी चिरडून टाकले जातात. मानवाधिकारांचे किती हनन होते याची तर गणतीच नाही. अखंड भारताचे स्वप्न खरोखरच साकारू शकेल का हे सांगता येत नाही, परंतु पाकिस्तानची अखंडता टिकेलच याचीही शाश्‍वती नाही हाच या सार्‍याचा मथितार्थ आहे! वायव्य सरहद्द प्रांताला पाकिस्तानच्या घशात कसे घातले गेले त्याची ही कहाणी वाचनीय तर आहेच, त्याच बरोबर अस्वस्थ करणारीही आहे.