पाकची आगळीक

0
90

भारत -पाकिस्तानदरम्यान विदेश सचिव पातळीवरील चर्चा तोंडावर आली असताना त्यामध्ये मिठाचा खडा टाकणारी आगळीक पाकिस्तानने केली. परवा जम्मू सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून युद्धबंदीचे सरळसरळ उल्लंघन करून आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या वीस ठाण्यांवर रात्रभर गोळीबार करण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानचे भारतातील दूत अब्दुल बसीत काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांसाठी खुद्द आपल्या राजधानीत दिल्लीमध्ये पायघड्या अंथरून बसले. एकेकाळी अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानशी मैत्रीचा हात दिलदारपणे पुढे केला, तर त्याची बक्षिसी म्हणून पाकिस्तानी लष्कराने कारगिलमध्ये आपले सैनिक पाठवले होते. आता मोदींनी पाकिस्तानशी भारताचे संबंध सुरळीत करण्याच्या दिशेने सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून पावले टाकायला सुरूवात केली, तर काहीही करून पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण व्हावा असे पद्धतशीर प्रयत्न पलीकडून सुरू झालेले दिसतात. आतापर्यंत ४८ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन पाकिस्तानी सैनिकांनी केले. या महिन्यातच जवळजवळ डझनभर वेळा युद्धबंदीचे उल्लंघन पाकिस्तानने केले. गेल्या आठ ऑगस्टला पाकिस्तानी रेंजर आणि भारतीय सीमा सुरक्षा दलादरम्यानची कमांडर पातळीवरील ध्वजबैठक झाली होती आणि त्यात शांततेच्या दृष्टीने परस्परांनी आणाभाकाही घेतल्या होत्या. असे असताना पाकिस्तानने आपल्या सवयीनुसार कुरापत काढली आहे. ही नुसती कुरापत नाही, तर त्यामागे एक व्यापक षड्‌यंत्र आहे हे गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती पाहिली तर कळून चुकते. सीमेपलीकडे चाळीस ठिकाणी दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत आणि सातशे अतिरेकी भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशी ही गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे. जेव्हा अशा प्रकारच्या घुसखोरीला संधी द्यायची असते तेव्हा पाकिस्तानी रेंजर गोळीबार करून त्यांना कव्हर पुरवीत असतात हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. सध्या काश्मीर खोर्‍यामध्येही हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसते. सीमा सुरक्षा दलाच्या एका पथकावर नुकताच सशस्त्र हल्ला झाला आणि त्यात काही शहीद झाले. त्यामुळे शांत असलेल्या काश्मीरला पुन्हा अशांततेच्या खाईत लोटण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू झाले आहेत असे दिसते. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच आपल्या लेह भेटीत पाकिस्तानला चार खडे बोल सुनावले. युद्ध लढण्याची क्षमता हरवून बसलेला पाकिस्तान आता ‘प्रॉक्सी वॉर’ लढत आहे असा आरोप त्यांनी केला. पण या प्रॉक्सी वॉरकडे पाहात मोदी सरकार स्वस्थ बसणार की त्याविरुद्ध कडक पावले उचलणार हा खरा सवाल आहे. ‘काश्मीरमधील परिस्थितीच्या अभ्यासासाठी’ पाकिस्तानच्या दूताने शब्बीर शाह, मिरवाईज उमर फारुख, सईद अली शाह गिलानी आणि यासीन मलीक यांना भेटीचे आमंत्रण दिले. काल शब्बीर शाहशी पाकिस्तानी दूत अब्दुल बसित यांनी जवळजवळ तासभर चर्चा केली. पाकिस्तानने फुटिरतावाद्यांशी उघड उघड संधान जुळवण्याचे प्रयत्न भारत सरकारच्या नाकावर टिच्चून चालवलेले आहेत आणि त्यासंदर्भात सरकार काहीही करीत नाही असे चित्र त्यामुळे निर्माण झाले होते. भारताने पाकिस्तानशी होणार असलेली विदेश सचिव पातळीवरील चर्चा रद्द करण्याचा खमका निर्णय घेऊन पाकिस्तानला चांगला दणका दिला आहे. या दूताची पाकमध्ये परत पाठवणीही होऊ शकते. एकीकडे पाकिस्तानी रेंजर भारतीय हद्दीतील आपल्या ठाण्यांवर अंदाधुंद गोळीबार करीत असताना भारतीय विदेश सचिव सुजाता सिंग पाकिस्तानी विदेश सचिव ऐझाज अहमद चौधरीं यांची येत्या पंचवीस ऑगस्टची बैठक झाली असती, तरी त्यामध्ये पोकळ शाब्दिक इशार्‍यांपलीकडीे काहीही निष्पन्न झाले नसते. पाकिस्तानसंदर्भातील आपली बोटचेपी नीती बदलण्याची वेळ आलेली आहे. नरेंद्र मोदी सरकारला ज्या कारणांसाठी जनतेने सत्ता दिली, त्यातील एक महत्त्वाचे कारण पाकिस्तानकडून होणार्‍या सततच्या आगळिकींबाबत मागील सरकारचे मवाळ, हतलब धोरण हेही होते. आता सत्तेवर आल्यावर मोदी सरकारही मनमोहन सरकारचेच बोटचेपे धोरण पुढे चालवणार असेल तर तो जनतेचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे विदेश सचिव पातळीवरील चर्चाच रद्द करून सरकारने पाकिस्तानला चांगलीच फटकार लगावली आहे.