पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

0
19

वाढत्या तापमानासोबतच ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील 102 मतदारसंघांत शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी 5 वाजता थंडावल्या.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी सायंकाळी संपला. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. देशातील 21 राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांसाठी हे मतदान होणार असून, 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांसह 1626 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
19 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील 8, राजस्थानातील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, बिहारमधील 4, महाराष्ट्रातील 5, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 1, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी 2, त्रिपुरामधील 1, उत्तराखंडमधील 6, तामिळनाडूमधील 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर मतदार संघातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपले नशीब आजमावत आहेत. येथे त्यांची लढत माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या सोबत आहे. तर आसामच्या दिब्रूगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीच्या मैदानात आहेत.