पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांबाबत सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय

0
24

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

तज्ज्ञांची समिती व कृती दलाने पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतचे शाळांचे वर्ग सुरू करण्याची शिफारस केलेली असली तरी हे वर्ग सुरू करावेत की नाही त्यासंबंधीचा निर्णय सरकार शनिवारपर्यंत सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतर घेणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यातील बर्‍याच विद्यालयांत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. अशा विद्यालयांविषयी सरकारला चिंता आहे. त्यामुळे विद्यालये सुरू करावीत की नाहीत यासंबंधीचा निर्णय सरकार घाईगडबडीत घेणार नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकार शाळांचे व्यवस्थापन, पालक-शिक्षक संघ, राजकीय पक्ष, शिक्षण अधिकारी अशा वेगवेगळ्या घटकांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेणार आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच योग्य काय तो निर्णय सरकार घेणार असल्याचे सावंत यांनी काल स्पष्ट केले.
कमी विद्यार्थी असलेल्या शाळांविषयी सरकारला चिंता नाही. पण राज्यातील कित्येक विद्यालयांत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शारीरिक अंतर ठेवून वर्गात कसे बसवता येईल याची आम्हाला चिंता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शनिवारपर्यंत सरकार योग्य काय तो निर्णय घेईल, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.