पहिला टप्पा झाला!

0
51

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील मतदान काल झाले. उत्तर प्रदेशमधील निवडणुका ह्या पश्‍चिमेकडून पूर्वेकडे ह्या क्रमाने होत असतात. त्यामुळे पश्‍चिमेकडील श्यामली, हापूर, गौतमबुद्धनगर, काही वर्षांपूर्वी दंगलींमुळे गाजलेले मुझफ्फरनगर, मीरत, बागपत, गाझियाबाद, बुलंदशहर, आग्रा, मथुरा, अलीगढ वगैरे अकरा जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी काल पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. हा सगळा पश्‍चिमी उत्तर प्रदेशचा भाग हा बहुतांशी जाटांच्या प्रभावाखालील गणला जातो. येथील किमान तीस मतदारसंघांमध्ये जाट समाजाचे प्राबल्य आहे. शिवाय केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषि कायद्यांविरुद्ध जे शेतकर्‍यांचे महाआंदोलन झाले, त्याचे हा सारा भाग हे केंद्र होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या भागामध्ये कोण बाजी मारतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या भागात प्रामुख्याने ऊस उत्पादक आहेत आणि केंद्र सरकारच्या आधारभूत किंमतीच्या आणि इथेनॉल आणि जैवइंधनाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे फायदा झालेले ऊस उत्पादक भाजपच्याच पाठीशी राहतील असे दावे भाजपचे नेते करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात येथे काय घडते याविषयी निश्‍चितपणे कुतूहल आहे. पहिल्या टप्प्यात काल मतदान झालेल्या जागांपैकी नोयडातून केंद्रीय मंत्री राजनाथसिंहांचे पुत्र पंकज सिंह उभे आहेत.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा सारा भाग भाजपाने पादाक्रांत केला होता. समाजवादी पक्षाला या भागात तेव्हा केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. शेतकरी आंदोलनामुळे सांगितले जात आहे तशी खरोखर परिस्थिती पालटली आहे का, ह्या भागामध्ये प्रभावी असलेल्या जाटांचे नेते जयंत चौटाला यावेळी भारतीय जनता पक्षाचे त्यांना सोबत घेण्याचे सारे प्रयत्न नाकारून समाजवादी पक्षासमवेत गेलेले असल्यामुळे त्याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार का, याविषयीही निश्‍चितपणे उत्सुकता आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक ही यावेळी मोठी कसोटी ठरणार आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भगवे वादळ निर्माण करण्यात ते दोघे यशस्वी ठरले खरे, परंतु तेव्हा उफाळलेली ती भगवी लाट अजूनही कायम आहे का याचे उत्तर ही निवडणूक देणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात खरोखरीच चमत्कार घडवण्यात मोदी – शहा यशस्वी ठरले होते. त्यानंतर २०१७ ची विधानसभा निवडणूक आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक या दोन्हींमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन केले, परंतु यावेळी बदललेल्या परिस्थितीतही आपली व आपल्या सरकारची लोकप्रियता कायम राखण्यात योगी आदित्यनाथ यशस्वी ठरले आहेत का, की त्या लोकप्रियतेला ओहटी लागली आहे, हे येथील निवडणूक सांगेल.
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या. विशेषतः राज्यातील गुंडगिरीविरुद्ध त्यांनी खमकेपणाने उचललेली पावले, केंद्र सरकारच्या सहयोगाने राज्यात निर्माण केलेले महामार्गांचे व द्रुतगती मार्गांचे जाळे, अयोध्येतील राममंदिर उभारणीला या काळात मिळालेली चालना या सगळ्याचा त्यांना अपेक्षित असलेला मोठा राजकीय फायदा त्यांना या निवडणुकीत मिळणार का हेही पाहावे लागेल. कोवीडच्या लाटेचा सामना करण्यात योगी आदित्यनाथ सरकार कमी पडल्याचे वातावरण मध्यंतरी निर्माण झालेे. विशेषतः गंगेच्या किनार्‍यांवरील गावांत शेकडो मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला मोठा तडा गेला होता. त्यात निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपचे काही ओबीसी नेते विरोधकांना जाऊन मिळाले. योगींच्या प्रतिमेला या सार्‍यामुळे हा जो तडा गेला आहे, त्याचा कितपत परिणाम या निवडणुकीत होईल हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.
भाजपचे ‘डबल इंजिन सरकार’ निवडणुकीत चमक दाखवणार की मोदींनी ज्याला ‘दोन मुलांचा खेळ’ म्हणून हिणवले ते या खेळामध्ये योगींना नमवणार हे ह्या निवडणुकीचा निकाल सांगेल. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकालही अर्थातच इतर सर्व राज्ये व मतदारसंघांबरोबरच लागेल. त्यामुळे मतपेटीमध्ये काल काय जनमत बंदिस्त झाले ते पाहायला १० मार्चपर्यंत मोठी प्रतीक्षा करावी लागेल. पण शेवटी देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातूनच जात असतो, त्यामुळे उत्तर प्रदेशचा मतदार कोणाला कसा कौल देतो त्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतील हेही तितकेच खरे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे नेहमीच देशाचे लक्ष असते व यावेळीही ते आहे. आता पुढची पाळी आपली आहे!